इमारत पोर्तुगीज काळातील 200 वर्षे जुनी, संभाव्य अनर्थ टळला
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळासमोर असलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भाग शुक्रवारी मध्यरात्री कोसळला. ही इमारत पोर्तुगीज काळातील असून ती किमान 200 वर्षे जुनी असल्याचे मानले जात आहे. मध्यरात्री इमारतीचा भाग कोसळल्याने कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. दिवसा जर हा इमारतीचा भाग कोसळला असता तर भीषण परिस्थिती उद्भवली असती.
आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भाग मध्यरात्री 3.30 च्या दरम्यान कोसळला. या इमारतीच्या खाली पार्क केलेल्या एका दुचाकीचे त्यात नुकसान झाले. इमारतीचा भाग कोसळताच ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुकूर यांना कल्पना दिली. ते रात्रीच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या प्रकाराची कल्पना मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना तसेच मडगाव अग्निशामक दलाला दिली.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. मडगाव पालिकेच्या आपत्कालीन सेवेद्वारे इमारतीचा खाली कोसळलेला भाग हटविण्यात आला. त्याचबरोबर मडगाव अग्निशामक दलाने उर्वरित इमारतीला धोका पोचू नये, यासाठी इमारतीच्या छतावर प्लास्टिकचे आवरण घातले.
अहवाल सादर करण्याचा आदेश
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे की, आरोग्य सेवा संचालनालयाला इमारतीची तात्काळ पाहणी करण्यास आणि दुऊस्तीसाठी गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे समस्या मांडण्यास सांगितले आहे. तसेच आरोग्य खात्याच्या संचालकांना देखील सद्य परिस्थितीवर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल आरोग्य सचिव, सरकार आणि मंत्रिमंडळाकडे ठेऊन पुढील कृती केली जाणार असल्याचे मंत्री श्री. राणे यांनी म्हटले आहे.
आरोग्य खात्याच्या संचालकांकडून पाहणी
आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी काल शनिवारी सकाळी मडगाव आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मडगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुकूर तसेच अभियंते उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाल्या की, ही इमारत जुनी असून तिची देखभाल केली जात होती. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे इमारतीचा थोडा भाग कोसळला. त्यात किती नुकसान झाले याची माहिती अभियंत्यांकडून मिळविली जाणार आहे. इमारतीचा उर्वरित भाग सुरक्षित असून तो कार्यरत ठेवला जाणार आहे.
मडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात असून लोक मोठ्या संख्येने लहान मुलांना घेऊन येतात. इमारतीचा काही भाग कोसळल्याने हे लसीकरण केंद्र जुन्या हॉस्पिसियो इस्पितळात स्थलांतरित करणे शक्य आहे का ? याची देखील काल आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर, डॉ. सुकूर तसेच अभियंत्यांनी पाहणी केली. यासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य खात्याच्या इमारतीचा भाग कोसळला, त्या ठिकाणी पाण्याची गळती नव्हती. तरीसुद्धा हा भाग कोसळल्याने डॉ. सुकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले. या इमारतीची देखभाल केली जात होती, अशी माहिती डॉ. गीता काकोडकर यांनी दिली.
विरोधकांकडून सरकारवर टीका
मडगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारचे सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष झाले आहे. पोर्तुगीज कालीन इमारतीची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक असून ज्या इमारती धोकादायक आहे. त्याचा वापर बंद केला पाहिजे. पण, सरकार अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे.
काँग्रेस पक्षाचे योगेश नागवेकर, प्रदीप नाईक तसेच महेश नाडर तसेच इतरांनी कोसळलेल्या इमारतीची पाहणी









