सर्वसामान्य व्यावसायिकांची मनपाकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे व्यापारी व व्यावसायिक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. प्रथम वापरण्याजोगे प्लास्टिक तसेच कापडी पिशव्या उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, त्यानंतरच ही मोहीम तीव्र करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. बऱ्याच वस्तू प्लास्टिकमधूनच द्याव्या लागत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांमधील जिन्नस खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. तुम्ही अवश्य प्लास्टिकविरोधी मोहीम राबवा, त्याला आमचा पाठिंबा राहील. मात्र, अचानकपणे अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करून वेठीस धरू नये, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
सरकारने प्रथम प्लास्टिकला पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. काही पर्याय काढले गेले तरी त्यामध्ये सातत्य ठेवण्यात आले नाही. त्यामुळे त्याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. आता बऱ्याच प्रमाणात कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर होत आहे. मात्र, काही पदार्थ प्लास्टिकमध्ये बांधल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. अन्यथा, पावसात भिजून त्यांना फटका बसू शकतो, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिकविरोधात तीव्र मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिक जप्त करून कारवाई केली जात आहे. दंडदेखील आकारला जात आहे. मात्र, यामुळे आम्हाला मोठा फटका बसत आहे. एक तर व्यवसाय नाही, त्यातच अशा प्रकारे दंडात्मक कारवाई केल्यावर आम्ही व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न आता लहान-मोठे व्यावसायिक करू लागले आहेत. प्रत्येकानेच सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांनीही प्लास्टिक पिशव्यांची मागणी करू नये, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तेव्हा साऱ्यांनीच याचा सारासार विचार करून प्रथम जनजागृती करावी, याचबरोबर प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून त्यानंतर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कृष्णा पाटील
महापालिकेने प्लास्टिक बंदी करण्यासाठी मोहीम राबविली आहे. मात्र, तत्पूर्वी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. केवळ दुकानदारच नाही तर नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे मोहीम राबविणे चुकीचे असून यासाठी योग्य वेळ निवडून जनजागृती करावी. महत्त्वाचे म्हणजे एक किलो साखर विक्रीवर केवळ एक ते दीड रुपये नफा असतो. मात्र, महापालिकेकडून लागू करण्यात आलेली प्लास्टिक बॅग दीड रुपये किमतीची आहे. त्यामुळे त्याचा फटका दुकानदाराला बसत आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. ग्राहकांनीही पूर्वीसारख्या कापडी पिशव्या वापरणे महत्त्वाचे असल्याचे येळ्ळूर रोडवरील रेणूका स्टोअर्सचे मालक कृष्णा पाटील यांनी सांगितले.









