वृत्तसंस्था/ झाग्रेब
युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘ग्रँड चेस टूर’चा भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या रॅपिड विभागातील आठव्या फेरीत आपला आदर्श विश्वनाथन आनंदवर संस्मरणीय विजय मिळवला. 17 वर्षीय गुकेशने 40 चालींत मिळवलेला विजय हा त्याचा आनंदवरचा पहिलाच विजय आहे. पाचवेळचा विश्वविजेता आनंदविऊद्ध एखाद्या स्पर्धेतील सामन्यात खेळण्याची त्याची ही पहिलीच खेप होती.
दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंचे आता प्रत्येकी 10 गुण झाले आहेत आणि ते चौथ्या स्थानावर आहेत. ‘हा खूप महत्त्वाचा विजय होता. मी आनंदित आहे,’ असे गुकेशने नंतर ‘ग्रँड चेस टूर’ स्पर्धेच्या सोशल मीडिया हँडलवर सांगितले. सामन्यानंतर आनंदसोबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, आम्ही खेळावर चर्चा करत होतो.
रॅपिड स्पर्धेच्या अंतिम दिवसानंतर फॅबियानो काऊआना आणि इयान नेपोम्नियाची हे प्रत्येकी 12 गुणांसह आघाडीवर राहिले आहेत. पहिल्या दिवशी आघाडीवर गेलेला आनंद आता त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी मागे पडला आहे, तर जागतिक क्रमवारीत अग्रक्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने पुनरागमन करत तिसरे स्थान पटकावले आहे. गुकेशकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाच्या व्यतिरिक्त आनंदने जेन-क्रिझिस्टॉफ डुडा (पोलंड) आणि नेपोम्नियाची यांच्याविऊद्धचे सामने बरोबरीत सोडविले. गुकेशची रॅपिड विभागातील शेवटच्या दिवसाची सुऊवात काऊआनाकडून पराभवाने झाली. पण नंतर त्याने आनंदला जबरदस्त धक्का दिला आणि डुडाला बरोबरीत रोखले.









