क्रेग ब्रेथवेटकडे नेतृत्वाची धुरा : डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झीचा प्रथमच संघात समावेश : 12 जुलैपासून पहिली कसोटी
वृत्तसंस्था/ त्रिनिदाद
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विंडीज निवड समितीने विंडीज संघाची घोषणा केली आहे. 12 ते 16 जुलै दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पॅनेलने 13 सदस्यीय संघाची निवड केली तर दोन राखीव खेळाडूंची नावे दिली आहेत. डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झीचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे, तर डावखुरा अॅलीक अथानेज हा संघातील अन्य अनकॅप्ड खेळाडू आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळणारा अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॅरिकन संघात परतले आहेत.
विंडीज संघ व्यवस्थापनाने क्रेग ब्रेथवेटकडे नेतृत्वाची धुरा सोपवली असून कायल मेअर्स आणि नक्रमा बोनर यांना संघातून वगळले आहेत. मेअर्सने शेवटच्या कसोटी सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीज संघाने आपला शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. दोन सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडीजला 2-0 अशा पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात मेअर्सचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते. पण त्यानंतर तो खराब फॉर्ममध्येच दिसला. विश्वचषक क्वॉलिफायर्समध्येही त्याच्याकडून अपेक्षित प्रदर्शन करण्यात आले नाही. दरम्यान, 2023-2025 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरु होईल. डॉमनिका येथील विंडसर पार्क येथे 12 ते 16 जुलै दरम्यान पहिली कसोटी खेळली जाणार आहे. त्याच वेळी दुसरी कसोटी 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवली जाईल.
पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडीज संघ-
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टॅगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शेनॉन गॅब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, मॅकेन्झी, रेमन रीफर, केमर रोच, जोमेल वॉरिकन.









