संरक्षणाशी संबंधित मोठा करार होणार अंतिम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सोमवार, 10 जुलैला मलेशियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. सिंग आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात मलेशियाचे संरक्षण मंत्री दातो सेरी मोहम्मद हसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करत यासंबंधी माहिती दिली असून भारत आणि मलेशियामधील भागिदारी वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजनाथ सिंग यांच्या या भेटीमुळे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत होईल. याशिवाय राजकीय भागिदारीही वाढेल.
दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या भेटीत सुरक्षाविषयक सहकार्याचा आढावा घेतला जाईल. तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील. दोन्ही देश द्विपक्षीय हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करतील. या भेटीदरम्यान राजनाथ सिंग मलेशियाच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत आणि मलेशिया या दोन्ही देशांचे संपूर्ण क्षेत्राच्या शांतता आणि समृद्धीमध्ये समान हित आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत आणि बहुआयामी संबंध असून ते संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत. मलेशिया आणि भारत 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यादरम्यान स्थापित केलेल्या प्रगत धोरणात्मक भागिदारीच्या दृष्टीकोनानुसार काम करण्यास कटिबद्ध आहेत.









