प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News: 2023 मधील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नासंदर्भात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, शासकीय ठराव या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी दिली.आमदार जाधव यांनी पत्रकाव्दारे मांडलेले प्रश्न, त्यावर शासनाकडून देण्यात आलेला सकारात्मक प्रतिसाद, सुरू करण्यात आलेली कार्यवाही याबद्दल माहिती दिली आहे.
पत्रकात आमदार जाधव यांनी म्हटले आहे की :
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियान राज्य योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील 16 रस्त्यांच्या कामासाठी 110.33 कोटी रुपयांच्या निधीस त्वरित मान्यता द्यावी, याकडे अधिवेशनाचे लक्ष वेधले होते. त्याआधी मंजुरीसाठी माझे पती व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रकल्पाला मान्यता दिली असून पुढील कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह आणि राजर्षि शाहू खासबाग मैदान या ऐतिहासिक वास्तूंच्या शताब्दी वर्षानिमित्त महानगरपालिकेत 10 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यातून काम पूर्ण झाले असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्याची निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरू आहे. दुधाळी नाला, जयंती नाला, बापट कॅम्प नाला व लाईन बझार नाला या मैलमिश्रणाच्या चार प्रकल्पास केंद्रपुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत केंद्र शासन शिखर समितीने मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता देवून प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरू आहे. तसेच शहारांतर्गत 350 कोटी रुपये ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव मंजुरीला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाहू महाराज समाधी स्थळाच्या सुशोभीकरण व इतर कामासाठी मंजूर निधीवर स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवावी मी केलेली मागणी पूर्ण झाली. त्यानंतर 9 कोटी 40 लाख 56 हजार रुपयांच्या कामांना राज्यशासनाने मान्यता दिली आहे. या कामांचा प्रारंभ शाहू जयंती दिवशी झाला आहे.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास शासनाने संमती दर्शविली असून 79.96 कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी सरस्वती चित्रमंदिरानजीक बहुमजली पार्किंग बांधण्यासाठी रु. 7.92 कोटी इतक्या निधीची कामे सुरु आहेत. वितरित केलेल्या 8 कोटी 20 लाखांपैकी 5 कोटी 55 लाखांचा निधी महानगरपालिकेकडून खर्च झालेला असून 2 कोटी 65 लाखांचा निधी शिल्लक आहे. यामुळे उर्वरीत कामांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2 कोटी 50 लाखंचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याचबरोबर शहरामध्ये सी.सी.टिव्ही यंत्रणा बसवणे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकुल, तेजस्विनी बस योजना, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आदी प्रश्नांवर सकारात्मक असल्याचे शासनाने कळविले आहे.
येत्या पावसाळी अधिवेशनात भरघोस निधीची मागणी करणार
राज्य विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये शहरातील आणि मतदार संघातील समस्या लक्षवेधी व तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून मांडून जोरदार निधीची मागणी करणार असल्याचेही आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
शाहू मिलची जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी समिती
शाहू मिलच्या जागेचा विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी शाहू मिलची जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात केली होती. त्यासाठी शासकीय स्तरावर समिती गठित करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पत्रात नमूद केले आहे.









