पुणे / प्रतिनिधी :
वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त मोहिमेदरम्यान पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथे एटीएम लुटण्याच्या तयारीत एक संशयित दरोडेखोरांची टोळी होती. पुणे पोलिसांतर्फे गस्त मोहीम सुरू असतांना त्यांना हा प्रकार त्यांना दिसला. संबधित दरोडेखोरांना पोलीस अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना, दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील बंदूक पोलिसांवर रोखली. दरम्यान, एका आरोपीने गोळी झाडल्याने तसेच एकाने कोयता फेकून मारल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. आरोपी पळून जात असतांना पाच जणांना पोलिसांनी अटक केली, तर इतर पाच आरोपी हे अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींचा शोध चालू आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एक गावठी कट्टा, चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर ,हातोडा असा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.









