प्रतिनिधी, रत्नागिरी
Ratnagiri News : तमाम रत्नागिरीकर व कलाकारांचे मानबिंदू असणाऱ्या शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात अत्यंत खेदजनक बाब समोर आली आहे.कारण या नाट्यगृहाच्या छतामधून मुसळधार पाऊस पडू लागल्याने पाणी जमा करण्यासाठी रंगमंचावर बादल्या ठेवण्यात आल्या आहेत.यामुळे सध्या नाट्यगृहात थेंबे थेंबे पाऊस पडे..अशी गत पहायला मिळत आहे.
यानिमित्ताने रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या नाट्यगृहाबाबत नगर परिषदेच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.रंगमंच हा लाकडी असल्याने त्याचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यकच आहे.मात्र मुळात छतच गळू नये,याची खबरदारी पावसाळ्यापूर्वी घेणे आवश्यक होते.मात्र ती न घेतल्याने छतामधून पाणी गळू लागले आहे.एकीकडे नगर परिषदेचे प्रशासक तुषार बाबर यांचा नाट्यगृह सुयोग्य असल्याचा दावा यामुळे फोल ठरत आहे.त्यामुळे ज्या रंगमंचावर कलाकार आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकतात,त्याच रंगमंचावर आज गळणाऱ्या पाण्यासाठी बादल्या ठेवायची नामुष्की रत्नागिरी नगर परिषदेवर आली आहे. एकीकडे शहरात प्रमुख ठिकाणी सुशोभिकरण केले जात असताना नाट्यगृहाबाबत मात्र नगर परिषदेचे कमालीचे निराशाजनक धोरण आहे.त्यामुळे नाट्यगृहाचा हा वनवास कधी संपणार,याकडेच रत्नागिरीकर व कलाकार डोळे लावून बसले आहेत.
गेली कित्येक वर्षे नाट्यगृहाची हीच गत आहे.गळणाऱ्या पाण्याने काही सीट्सही गतवर्षी खराब झाल्या होत्या.याची नगर परिषदेला कल्पना असली तरी छताची साधी पावसाळ्यापूर्वी डागडुजीही केलेली नाही.यामुळेच गेले 8 दिवस पाणी अधूनमधून गळत आहे,ज्यात गुरुवारी वाढ झाली अशी व्यथा ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता केळकर यांनी व्यक्त केली.









