ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी आजही धडधाकट असून, पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार. यापूर्वी अनेकांनी जोमानं मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमच्यासोबत मोरारजी देसाई अत्यंत जोमाने काम करायचे. तेव्हा त्यांचं वय 84 होतं. ते देशाचं किती काम करतात, याची चर्चा देशभरात व्हायची. त्यामुळे वयाचा काहीही मुद्दा नाही. “ना टायर्ड हूँ… ना रिटायर्ड हूँ…मैं तो फायर हूँ’ या अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला देत त्यांनी वय झाल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
येवल्याच्या सभेपूर्वी शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकला मोठा इतिहास असल्याने दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून करत आहे. या दौऱ्यावर येत असताना लोकांचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी येवलामधून निवडणूक लढवावी असं सहकाऱ्यांनी सांगितलं आणि भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. त्यानंतर नाशिकमध्ये मोठं यश आम्हाला मिळालं होतं.
आमदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मी महाराष्ट्र दौरा करत आहे. मला वैयक्तिक कोणावरही टीका करायची नाही. मात्र, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार, हे नक्की. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्ष मंत्रिपद दिलं, लोकसभेत पराभव होऊनही त्यांना राज्यसभेत पाठवलं, मात्र मनाविरुद्ध गोष्ट झाली, अशी खंतही यावेळी पवार यांनी व्यक्त केली.








