भगदाड ऊंदावले, लगतच्या कांतोर खाजनातील शेतकरी संकटात
जुने गोवे : चोडण येथील कावा खाजनाच्या बांधाचा नदीच्या बाजूचा आणखी भाग खचला असून काल लहान असलेले भगदाड आणखी ऊंदावल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तशातच कावा खाजनातील पाणी लगतच्या कांतोर खाजनात घुसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यानी पेरणी केलेल्या भाताची रोपे कावा खाजनातील पाण्याच्या लोटाने पाण्यावर तरंगत आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कांतोर खाजनात एकनाथ मापारी, मिलिंद होमखंडी, दिलीप दळवी या शेतकऱ्यांनी पावसाला सुऊवात होताच भात बियाणे पेरले होते. पण पाण्याच्या लोटाने बोटभर वाढलेली भाताची रोपे उन्मळून पाण्यावर तरंगू लागली आहेत. कावा खाजनात पेरणी केलेले शेतकरी दिलीप पेडणेकर, रमाकांत प्रियोळकर व रोहिदास पेडणेकर यांनी पेरणी करण्यासाठी घेतलेली मेहनत व केलेला खर्च वाया जाणार या विचाराने चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान शुक्रवारी सकाळी संबंधित खात्याचे अभियंते व ठेकेदार यांनी कोसळलेल्या बांधाची पाहणी केली. लवकरात लवकर भगदाडातून कावा खाजनात शिरणारे पाणी बंद करण्याचा आदेश यावेळी अभियंत्यांनी ठेकेदाराला दिला आहे. तसेच यावेळी चोडणचे सरपंच पंढरी वेर्णेकर, पंचायत सदस्य संजय कळंगुटकर, रमाकांत प्रियोळकर यांनी भगदाड पडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी बांधाचा ताबा समितीकडे सोपवल्यावर आम्ही बांधाची त्वरित तपासणी करून बांधाचे बांधकाम योग्य दर्जाचे नसल्याचे पत्राद्वारे संबंधित यंत्रणेला कळविले होते, असे कावा खाजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत प्रियोळकर सांगितले.









