महापालिकेसमोर निदर्शने : मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाला लागूनच जयकिसान भाजीमार्केटची बेकायदेशीररित्या उभारणी करण्यात आली आहे. न्यायालयात खटला प्रलंबित असताना या मार्केटची उभारणी करण्यात आली. त्याची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी एपीएमसीमधील भाजीमार्केट व्यावसायिकांनी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती चौकशी करू, असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे व्यावसायिकांनी धरणे आंदोलन मागे घेतले. जयकिसान भाजीमार्केटची उभारणी करताना सर्व नियम धाब्यावर बसविले. महापालिका, बुडा यांच्याकडून घेतलेली परवानगीदेखील बेकायदेशीर असून त्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. जमिनीची नोंद करतानाही चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून साऱ्यांचीच दिशाभूल केली आहे. तेव्हा त्याची पूर्ण चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडून परवानगी घेताना खोटी कागदपत्रे दिली गेली आहेत. त्याची सखोल चौकशी करावी. महसूल विभागाचीही यामध्ये फसवणूक झाली आहे. त्याचीही चौकशी करणे महत्त्वाचे आहे. बुडाकडून घेतलेली परवानगीदेखील बोगस आहे. याचा सारासार विचार करून संबंधित भाजीमार्केटवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. एपीएमसी भाजीमार्केटवर सरकारचे नियंत्रण असते. मात्र खासगी भाजीमार्केटवर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यामुळे तेथील व्यावसायिक मनमानीपणे कारभार करू शकतात. तेव्हा त्याचाही सारासार विचार करावा, असेदेखील या निवेदनात म्हटले आहे. 100 हून अधिक व्यावसायिकांनी मनपासमोर ठाण मांडून निषेध नोंदविला आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी बोलताना म्हणाले, निश्चित याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी बेळगाव जिल्हा भाजीपाला व्यापारी कल्याण विकास संघटनेचे अध्यक्ष गजानन शहापूरकर, उपाध्यक्ष बसनगौडा पाटील, सदानंद पाटील, सतीश पाटील, विनायक राजगोळकर, संदीप आंबोजी, सुरेश मुतगेकर, नितीन मुतगेकर, महेश पाटील, शांता होसूर, मोहसीन धारवाडकर, आशिफ कलमनी व व्यापारी उपस्थित होते.









