एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोऱ्या : चोरट्यांचा धुमाकूळ
बेळगाव : नागनूर (ता. बैलहोंगल) येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एका सराफी दुकानासह तीन ठिकाणी चोऱ्या करण्यात आल्या असून 27 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. शुक्रवारी सकाळी चोरीच्या या घटना उघडकीस आल्या आहेत. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, नेसरगीचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. नागनूर येथील एका सराफी दुकानाचे कुलूप तोडून 5 लाख 11 हजार 300 रुपये किमतीचे 9 किलो 961 ग्रॅम चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. यासंबंधी अमित अशोक शेट्टी यांनी नेसरगी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. दुसरी घटना याच परिसरात झाली आहे. बसाप्पा चन्नाप्पा इंचल यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 4 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 20 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. कुटुंबीय परगावी होते. तिजोरी फोडून तिजोरीतील सर्व दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. याच गावातील आणखी एक घर फोडले आहे. बसवराज दुंडाप्पा अल्लप्पन्नवर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 1 लाख 53 हजार 200 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. एकाच रात्रीत घडलेल्या चोऱ्यांमुळे परिसरात भीती पसरली आहे.









