गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमणूक : चोऱ्या, वादावादीच्या प्रकाराला आळा
बेळगाव : महिला प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 11 जूनपासून शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बसप्रवास दिला जात आहे. त्यामुळे बसस्थानक आणि बसेसमध्ये महिलांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान चोऱ्या आणि इतर अनुचित प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी बसस्थानकात होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे इतर अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. बेळगाव विभागात 27 पुरुष व महिला होमगार्ड, 1 पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकातील चोऱ्या आणि इतर प्रकारांना चाप बसणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन 600 हून अधिक बस विविध मार्गावर धावतात. त्यामध्ये वातानुकूलित व्होल्व्हो आणि राजहंस बसचा समावेश आहे. महिलांना मोफत बसप्रवास मिळत असल्याने स्थानिक आणि लांबपल्ल्याच्या बसेसमध्ये गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, बसमध्ये आसन मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यातूनच भांडणाचे प्रकार वाढू लागले आहेत. बसमध्ये महिलांच्या वादावादीचे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक बसस्थानकात होमगार्ड ठेवण्यात आले आहे.
गर्दीचा चोरट्यांना फायदा
मागील महिन्यापासून महिलांचा मोफत बसप्रवास सुसाट सुरू झाला आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्या, चांदीचे दागिने, वस्तू, पर्स, रोख रक्कम पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसू लागला आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठीच परिवहनने होमगार्डची सेवा घेतली आहे. दरम्यान होमगार्ड रक्षकांना सर्वकाही योग्य असल्याची खात्री दिल्यानंतरच बसचा प्रवास सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तुंना संरक्षण मिळत आहे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू हरविल्याची तक्रार आल्यास प्रवाशांना बसमध्येच थांबून दरवाजा न उघडता चौकशी केली जाणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड तैनात…
मध्यवर्ती बसस्थानकात चोऱ्या आणि इतर प्रकारापासून प्रवाशांना सुरक्षा मिळावी यासाठी होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. महिलांचा मोफत बसप्रवास सुरू झाल्यापासून चोऱ्या आणि वादावादीचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर आळा घालण्यासाठी होमगार्ड नेमण्यात आले आहेत.
– गणेश राठोड (विभागीय नियंत्रक केएसआरटीसी)









