शेतीकामाला वेग : भात रोपलागवडीलाही प्रारंभ
वार्ताहर /गुंजी
गेल्या महिन्याभरापासून रेंगाळलेल्या पावसाने गुंजी परिसरात गुरुवारपासून जोर धरला असून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. या भागात वळिवाने पाठ फिरविली होती. त्यापाठोपाठ मान्सूननेही शेतकऱ्यांना बरीच प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. त्यामुळे येथील कांही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी रोपलागवडीचा मार्ग धरला. वास्तविक या परिसरामध्ये बहुतांश शेतकरी भातपेरणी करतात. मात्र यावषी या भागात वळीव पाऊस एकदाही न झाल्याने शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. मे अखेरीस एकदाच या भागात वळिवाचा जोरदार पाऊस पडल्याने येथील शेतकऱ्यांनी भातपेरणी केली होती. सखल भागातील अनेक शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ झाला नसल्याने त्यांनी रोपलागवडीचा निर्णय घेतला. गुऊवारपासून दमदार पाऊस होत असल्याने शेतवडीमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे भात हंबडण आणि भात लागवडीची कामे करण्यास शेतकऱ्यांनी सुऊवात केली आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांची कामे एकाचवेळी सुरू केल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांबरोबरच रामनगर येथूनही मजूर आणून भात रोपलागवडीचे काम करण्यात शेतकरी गुंतला आहे. मध्यंतरीच्या काळात पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या भातशेतीमध्ये तणाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाल्याने पाण्यातील कोळपणीलाही सुऊवात केली आहे. पावसाबरोबरच वाऱ्याचा जोर पाहता पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्मयता आहे.









