मोफत बसपास-मुलांची शिष्यवृत्तीही बंद : कित्येकवेळा निवेदने देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : असंघटित कामगारांना मिळणाऱ्या सुविधा बंद झाल्याने कामगारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. मोफत बसपास आणि मुलांसाठी मिळणारी शिष्यवृत्तीदेखील बंद झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. कामगारांना सुविधा मिळत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत कित्येकवेळा निवेदने सादर करूनदेखील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. बांधकाम कामगारांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मोफत बसपास सेवा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र मागील कित्येक महिन्यांपासून ही सुविधा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती सहा महिन्यांपासून बंद झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक जीवन त्रासाचे होऊ लागले आहे. मोलमजुरीवर उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा बंद झाल्याने कामगारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील सरकारने मोठा गाजावाजा करून बांधकाम कामगारांसाठी मोफत बसपास प्रक्रिया सुरू केली. मात्र काही दिवसांतच ही मोहीम बंद पडली. त्यामुळे या योजनेपासून कामगारांना वंचित राहावे लागले आहे. कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, आर्थिक फटकाही बसू लागला आहे. जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 96 इतकी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे. मात्र या सर्व कामगारांना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार आपल्याकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही कामगारांना पडला आहे.
कामगारांसमोर अडचणी वाढल्या
मागील सहा महिन्यांपासून बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद झाली आहे. त्याचबरोबर कामगारांचा मोफत बसपासही बंद झाला आहे. त्यामुळे कामगारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. याबाबत मंत्री, अधिकारी आणि कामगार खात्यालादेखील निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
-अॅड. एन.आर. लातूर (जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष)









