वृत्तसंस्था/ लिमेरिक (आयर्लंड)
येथे सुरू असलेल्या विश्व युवा चॅम्पियनशिप सांघिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला तिरंदाजपटूंनी 18 आणि 21 वर्षाखालील वयोगटातील सांघिक विजेतीपदे मिळवली. या सांघिक जेतेपदाबरोबरच त्यांनी या दोन्ही गटामध्ये सुवर्णपदके घेतली.
18 वर्षाखालील महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या ऐश्वर्या शर्मा, आदिती स्वामी आणि एकता राणी यांनी अंतिम लढतीत अमेरिकेच्या ओलीव्हिया डिन, लिको अॅरेलो आणि लिन ड्रेक यांचा 214-212 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक व सांघिक जेतेपद पटकावले.
19 वर्षाखालील महिलांच्या वयोगटातील सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या अवनीत कौर, परनीत कौर आणि प्रगती यांनी मेक्सिकोच्या अॅड्रिना कॅस्टीलो, जिमनेझ व्हॅलेडेज आणि सिलेनी रॉड्रीग्ज यांचा 222-214 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. बुधवारी या स्पर्धेत कनिष्ठांच्या मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात प्रियांश आणि अवनीत कौर यांनी सुवर्णपदक मिळवले होते. पुरुषांच्या 18 वर्षाखालील वयोगटात सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात अंतिम लढतीत मेक्सिकोने भारताचा 216-215 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये बुधवारी भारताने दोन कास्यपदके मिळवली होती. मानव जाधव आणि ऐश्वर्या शर्मा यांनी कॅडेड मिश्र कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात तर पार्थ आणि रिद्धी यांनी कनिष्ठ रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात कास्यपदक मिळवले.
2023 च्या विश्व युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने तीन पदकांची कमाई केली. सदर स्पर्धा 3 ते 9 जुलै दरम्यान होत आहे. या स्पर्धेमध्ये 21 आणि 18 वर्षाखालील पुरुष आणि महिलांच्या रिकर्व्ह आणि कंपाऊंड या तिरंदाजी प्रकारामध्ये तसेच वैयक्तिक व सांघिक प्रकारात विविध देशांचे तिरंदाजपटू सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेमध्ये 58 देशांचे 277 पुरुष आणि 241 महिला तिरंदाजपटूंचा समावेश आहे.









