स्वत:वर गोळी झाडून घेत संपविले जीवन : तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
वृत्तसंस्था/ कोईम्बतूर
तामिळनाडूत कोईम्बतूर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सी. विजयकुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. विजयकुमार यांनी शुक्रवारी सकाळी निवासस्थानी स्वत:चे आयुष्य संपविले आहे. मागील काही दिवसांपासून विजयकुमार हे तणावात होते असे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
45 वर्षीय विजय कुमार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 2009 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले विजय कुमार यांनी 6 जानेवारी रोजी उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. यापूर्वी त्यांनी पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते.
विजय कुमार यांनी स्वत:च्या व्यक्तिगत सुरक्षा अधिकाऱ्याकडून त्याचे पिस्तुल मागितले, त्यानंतर त्यांनी सकाळी सुमारे 6.50 वाजता स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजते. काही आठवड्यांपासून आपण नीट झोपू शकलेलो नाही आणि नैराश्याने ग्रस्त असल्याचे विजयकुमार यांनी स्वत:च्या सहकाऱ्यांना सांगितले होते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. विजयकुमार यांचा मृत्यू पोलीस विभागासाठी एक मोठा धक्का आहे. विजयकुमार यांनी तामिळनाडू पोलीस दलात उत्तम सेवा बजावली होती. त्यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करतो असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
सी विजय कुमार यांच्यापूर्वी तिरुचेंगोड येथील तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विष्णुप्रिया यांनी 2015 मध्ये आत्महत्या केली होती.