अंत नसलेल्या शर्यतीत घेतला भाग
जगात आयोजित होणाऱ्या शर्यती या कुठेतरी सुरू होत एकेठिकाणी जाऊन संपतात. परंतु ऑस्ट्रेलियात एक अनोखी शर्यत आयोजित होते, ज्याची सुरुवात तर होते, परंतु त्याचा अंत निश्चित नाही. अलिकडेच ही शर्यत आयोजित झाली असून यात एका व्यक्तीने विजय मिळविला आहे. 4 दिवसांपर्यंत धावल्यावर या व्यक्तीला विजयी होता आले आहे. या शर्यतीच्या बळावर या व्यक्तीने आता स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नेंदविला आहे.
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या फिल गोरेने अलिकडेच डेड काउ गली बॅकयार्ड मास्टर्स अल्ट्रामॅराथॉनमध्ये भाग घेतला होता. या शर्यतीत कुठलीच फिनिश लाइन नसते. धावपटूंना 6.7 किलोमीटरचा लूप दर 1 तासात पूर्ण करायचा असतो. ही शर्यत तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत अखेरचा एक धावपटू शर्यतीत उरत नाही, त्यालाच विजेता घोषित केले जाते.
4 दिवसांत 685 किमीची धाव
यावेळी या शर्यतीचे आयोजन ब्रिस्बेनपासून 180 किलोमीटर अंतरावरील नानगो नावाच्या फार्ममध्ये झाले. या शर्यतीत धावपटूंचा स्टॅमिना पडताळून पाहिला जातो. ही शर्यत 17 जून रोजी सकाळी 7 वाजता सुरु झाली, तर 4 दिवसांनी ही शर्यत संपली आहे. फिल हे या 4 दिवसांपर्यंत 6.7 किमी लूपच्या फेऱ्या मारत राहिले. त्यांनी 102 वेळा या लुपला फेऱ्या मारल्या असून सुमारे 685 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले आहे.
विश्वविक्रमी कामगिरी
लुप यांनी 4 दिवसांत 685 किलोमीटर धावून विश्वविक्रम केला आहे. मागील वर्षी बेल्जियमच्या धावपटूने 101 लॅप धावून विश्वविक्रम केला होता. या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचे सॅम हार्वी राहिले आणि ते 101 लॅप धावले. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचे हार्वी लुइस राहिले असून त्यांनी 90 लॅपपर्यंत शर्यतीत भाग घेतला.









