वार्ताहर / केपे
केपे परिसरात मुस़ळधार पाऊस सुरू असून केपे शहरातून वाहणाऱ्या कुशावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. असाच जोर राहिला, तर आज पारोडा येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा पावसाने बराच उशीर केला असला, तरी गेले काही दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाने भरपाई केलेली असून अनेक ठिकाणी शेतात व रस्त्याच्या बाजूला पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सावधगिरीने वाहने चालविणे चालकांना भाग पडले आहे.
नेत्रावळी भागात़ून उगम होणारी व केपे शहरातून वाहणारी कुशावती नदी ही दुथडी भरून वाहू लागली असून पाण्याची पातळी बरीच वाढलेली आहे. असाच जोर राहिला, तर लवकरच पूर येऊन या नदीचे पाणी आजुबाजूच्या परिसरांत घुसण्याची शक्यता नाकारात येत नाही. तसेच पारोडा येथील पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मुस़ळधार पावसाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तूटून पडल्याने भर पावसात वीज कर्मचारी दुरुस्तीकामे हाती घेताना दिसले आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात तीन–चार वेळा पारोडा येथील पूल पाण्याखाली जात असतो तसेच केपे–मडगाव रस्त्यावर पाणी साचून चांदरमार्गे वाहतूक वळवावी लागते. मात्र यंदा पारोडा बाजार ते गुडीपर्यंत रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या बजूची उंची वाढवल्याने रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने आतापर्यंत पावसामुळे कोणतेच मोठे नुकसान झालेले नाही.









