पावसाअभावी पेरणी उद्दिष्टावर परिणाम, कृषी खात्याला चिंता
प्रतिनिधी / बेळगाव
कृषी खात्याने यंदाच्या हंगामात 7.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र पावसाअभावी आतापर्यंत केवळ 3.27 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यामुळे अद्याप भरपूर पेरणी क्षेत्र पडून आहे. त्यामुळे कृषी खात्याबरोबर बळीराजाची देखील चिंता वाढली आहे. शिवाय पेरणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणार की नाही, असा प्रश्नदेखील कृषी खात्याला पडू लागला आहे. खरिप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, बटाटा, तंबाखू, रताळी, ज्वारी, उडद, तूर, कापूस, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. मात्र पाऊस तब्बल महिनाभर लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शेती कामे रखडली आहेत. सध्या जिल्ह्यातील काही भागात किरकोळ पावसाला सुरुवात झाली आहे. तर अद्याप काही भागात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पेरणी कधी होणार? या चिंतेत शेतकरी आहेत.
जिल्ह्यात भात, सोयाबीन, ज्वारी, उडीद, भुईमूग पेरणीचे क्षेत्र अधिक आहे. मात्र पावसाअभावी पेरणीची कामे लांबणीवर पडली आहेत. काही भागात पुरेशा पावसाची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत. तर काही भागात किरकोळ पावसावरच पेरणीला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या पंधरवड्यात पेरणीचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण होते. मात्र यंदा केवळ 18 टक्केच पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास पेरणी झालेल्या पिकांनादेखील धोका निर्माण होणार आहे. काही भागात धूळवाफ पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाअभावी या पेरणीलादेखील फटका बसला आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाअभावी पाणी टंचाईदेखील निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेत-शिवारातील पिके देखील सुकू लागली आहेत. शिवारातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी सोडणेदेखील अडचणीचे झाले आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.









