विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : मेदवेदेव्ह, अँडी मरे, सित्सिपस, केनिन, फ्रान्सेस टायफो यांचीही आगेकूच, सॅकेरी, थिएम, मर्टेन्स स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था /लंडन
पोलंडची अग्रमानांकित इगा स्वायटेक आणि युक्रेनची एलिना स्विटोलिना, अमेरिकेची सोफिया केनिन यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. मेदवेदेव्ह, अमेरिकेचा फ्रान्सेस टायफो, होल्गर रुने, टेलर फ्रिट्झ, ग्रिगोर डिमिट्रोव्ह यांनी पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचनेही आगेकूच केली असून त्याने ग्रँडस्लॅममध्ये 350 वा विजय मिळविला. याशिवाय स्टेफानोस सित्सिपस, अँडी मरे यांनीही विजय मिळविले. डॉमिनिक थिएम, एलिस मर्टेन्स, मारिया सॅकेरी यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोचा 6-2, 6-0 असा केवळ 69 मिनिटांत धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत तिची लढत फ्रान्सची डायन पॅरी किंवा क्रोएशियाची पेत्रा मार्टिक यापैकी एकीशी होईल. अन्य एका सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या स्विटोलिनाने 28 व्या मानांकित जर्मनीच्या एलिस मर्टेन्सचा 6-1, 1-6, 6-1 असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मुलीच्या जन्मानंतर गेल्या एप्रिलमध्ये स्विटोलिनाने पुनरागमन केले होते. तिसऱ्या फेरीत तिची लढत अमेरिकेच्या सोफिया केनिनशी होईल. केनिनने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात चीनच्या वांग झिनयूवर 6-4, 6-3 अशी मात केली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या मेदवेदेव्हने आक्रमक व व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन करीत ग्रँडस्लॅममध्ये प्रथमच खेळणाऱ्या आर्थर फेरीचा 7-5, 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. त्याची दुसऱ्या फेरीची लढत अॅड्रियन मॅनारिनो किंवा अलेक्झांडर शेवचेन्को यापैकी एकाशी होईल. नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झने यानिक हन्फमनचा 6-4, 2-6, 4-6, 7-5, 6-3 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. त्याची पुढील लढत मायकेल वायमरशी होईल. वायमरने अॅलेक्स माल्कनचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव केला. अमेरिकेच्याच फ्रान्सेस टायफोने दुसरी फेरी गाठताना चीनच्या वु यिबिंगवर 7-6 (7-4), 6-3, 6-4 अशी मात केली. दहाव्या मानांकित टायफोची पुढील लढत स्विसचा डॉमिनिक स्ट्रिकर किंवा अॅलेक्सी पॉपिरीन यापैकी एकाशी होईल. डिमिट्रोव्हने पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात जपानच्या शो शिमाबुकुरोचा 6-1, 6-2, 6-1 असा पराभव केला. सहाव्या मानांकित डेन्मार्कच्या होल्गर रुनेने पहिल्यांदाच या स्पर्धेची दुसरी फेरी गाठताना ब्रिटनच्या वाईल्डकार्ड प्रवेशधारक जॉर्ज लॉफहॅगेनचा 7-6 (7-4), 6-3, 6-2 असा पराभव केला.
जागतिक द्वितीय मानांकित नोव्हॅक जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धांतील 350 वा विजय मिळविताना जॉर्डन थॉम्पसनचा 6-3, 7-6 (7-4), 7-5 असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. 350 सामने जिंकण्याचा माईलस्टोन गाठणारा जोकोविच हा तिसरा खेळाडू आहे. रॉजर फेडररने 369, अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने 365 सामने जिंकले आहेत. जोकोविचची पुढील लढत स्टॅन वावरिंका किंवा टॉमस मार्टिन एचेव्हेरी यापैकी एकाशी होईल. पाचव्या मानांकित ग्रीसच्या सित्सिपसने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत माजी जागतिक तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिएमचे आव्हान पाच सेट्सच्या झुंजीत 3-6, 7-6 (7-1), 6-2, 6-7 (5-7), 7-6 (10-8) असे संपुष्टात आणले. 3 तास 55 मिनिटे ही लढत रंगली होती. मंगळवारी दुसऱ्या सेटमधील सात गेम्स झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्याची लढत ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेशी होईल.









