वृत्तसंस्था /चितगाँग
बुधवारी येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणने यजमान बांगलादेशचा डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 17 धावांनी पराभव करत या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. या पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला होता. पंचांनी डकवर्थ लेविस नियमाचा वापर केला. बांगलादेश आणि अफगाणच्या डावामध्ये पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात 7 बाद 144 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला. 50 षटकाअखेर बांगलादेशने 9 बाद 169 धावा जमवल्या होत्या. यामुळे अफगाणला विजयासाठी 50 षटकात 170 धावांचे आव्हान मिळाले होते.
अफगाणचा डाव सुरू होण्यापूर्वीच पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी अफगाणला विजयासाठी 43 षटकात 164 धावांचे नवे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अफगाणने आपल्या खेळाला सुरुवात केली आणि त्यांनी 21.4 षटकात 2 बाद 83 धावा जमवल्या असताना पावसाचा पुन्हा अडथळा आला. अफगाण संघातील सलामीचा फलंदाज इब्राहिम झेद्रानने नाबाद 41 धावा झळकवताना गुरबाजसमवेत पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या शकीब अल हसनने गुरुबाजला 22 धावावर बाद केले. त्यानंतर बांगलादेशच्या तस्कीन अहमदने रेहमत शहाला 8 धावावर बाद केले. पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवण्यात आला. दरम्यान खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. त्यावेळी पंचांनी अफगाणला 29 षटकात 111 धावांचे उद्दिष्ट दिले होते. पण पुन्हा पावसाचा अडथळा आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी डकवर्थ लेविस नियमानुसार अफगाणला विजयासाठी 67 धावांची जरुरी होती. अफगाणने 21.4 षटकात 2 बाद 83 धावा जमवल्याने त्यांना पंचांनी 17 धावांनी विजयी म्हणून घोषित केले.
तत्पुर्वी बांगलादेशच्या डावामध्ये रिदॉयने 51 धावा झळकवल्या. या सामन्यात अफगाणचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या डावामध्ये पावसाचा अडथळा आला आणि खेळ पहिल्यांदा थांबवला गेला. त्यावेळी बांगलदेशने 15.1 षटकात 3 बाद 84 धावा जमवल्या होत्या. तमिम इक्बाल 13, लिटॉन 26, नजमुल हुसेन 12 धावावर बाद झाले. खेळाला दुसऱ्यांदा प्रारंभ झाला. त्यावेळी अफगाणच्या ओमरझाईने शकीब अल हसनने 15 धावावर बाद केले. रशीद खानने मुशफिकर रहिमचा त्रिफळा एका धावेवर उडवला. फरुकीने मेहदी हसन मिराजला 5 धावावर पायचित केले. रशीदने अफीफ हुसेनला 5 धावावर पायचित केले. 34.3 षटकात बांगलादेशची स्थिती 7 बाद 144 अशी होती. बांगलादेशच्या रिदॉयने शानदार अर्धशतक (51 धावा) झळकवले. अफगाणतर्फे रशीद खान आणि मुजिब उर रेहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अफगाणने यापूर्वी बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची वनडे मालिका गमवली होती. पण आता ते तीन सामन्यांच्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना चितगाँगमध्ये शनिवारी खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकात 9 बाद 169 (रिदॉय 51, इक्बाल 13, दास 26, नजमुल हुसेन 12, शकीब अल हसन 15, रशीद खान, मुजीब उर रेहमान प्रत्येकी 2 बळी), अफगाण 21.4 षटकात 2 बाद 83
(डकवर्थ लेविस नियमाआधारे विजयी).









