भारताची धारणा चुकीची असल्याची टिप्पणी : ‘किल इंडिया’प्रकरणी ट्रुडो यांचे स्पष्टीकरण : खलिस्तानींकडून भारतीय अधिकाऱ्यांना धमकी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कॅनडाच्या भूमीवरील खलिस्ताना समर्थकांच्या कारवायांसंबंधी तेथील पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्टीकरण देत भारताचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाच्या भूमीवर सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कॅनडातून खलिस्तानी दहशतवादी भारतविरोधी कारवाया करत असल्याची भारताची धारणा चुकीची असल्याचा दावा ट्रुडो यांनी केला आहे. ट्रुडो यांनी भारताच्या विरोधानंतरही एकप्रकारे खलिस्तानी कारवायांना क्लीनचिट दिली आहे. कॅनडा हा वैविध्यपूर्ण विचार राखणारा देश आहे. येथे सर्वांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. कॅनडाच्या भूमीवर शीख उग्रवाद फोफावत असल्याचे भारताचे म्हणणे चुकीचे आहे. कॅनडाने नेहमीच हिंसा आणि हिंसेच्या धमक्यांना अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. दहशतवाद विरोधात आम्ही नेहमीच गंभीर कारवाई केली असून यापुढेही करत राहू असे ट्रुडो म्हणाले.
भारताकडून आरोप
कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी मोकाटपणे फिरून भारतविरोधी कृत्य करत असल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कॅनडाच्या ब्रॅम्पटन शहरात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना दर्शविणारा देखावा खलिस्तानी दहशतवाद्यांकडून सादर करण्यात आला होता. तसेच मोस्ट वाँटेड दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर खलिस्तानींकडून ‘किल इंडिया’ पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. अशा घटनांमुळे दोन्ही देशांचे संबंध प्रभावित होऊ शकतात, असा इशारा भारताने दिला होता. कॅनडाने स्वत:च्या भूमीत खलिस्तान समर्थकांना थारा देऊ नये, अन्यथा भारत अन् कॅनडाच्या संबंधांना धक्का पोहोचू शकतो, असे वक्तव्य विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते.
खलिस्तान समर्थक
खलिस्तानसंबंधी नरमाईची भूमिका बाळगणारा नेता म्हणून ट्रुडो यांना ओळखले जाते. ट्रुडो यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात खलिस्तान समर्थकांना बळ मिळाले आहे. 2018 मध्ये ट्रुडो यांचा भारत दौरा वादग्रस्त ठरला होता. ट्रुडो यांच्यासोबत खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल भारत दौऱ्यावर येणार होता, परंतु अखेरच्या क्षणी भारताच्या आक्षेपामुळे अटवाल याला शिष्टमंडळातून वगळण्यात आले होते.
खलिस्तान समर्थकांना ब्रिटनचा इशारा
लंडनमधील भारतीय दूतावासाला घेराव घालण्याची धमकी खलिस्तान समर्थकांकडून देण्यात आल्यावर ब्रिटनच्या सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कुठल्याही प्रकारचा हल्ला हा पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. कायद्याचा भंग केल्यास कठोर कारवाई करू असे ब्रिटनचे विदेश सचिव जेम्स क्लेवरली यानी ट्विट करत म्हटले आहे. भारताच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरि असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘किल इंडिया’ पोस्टर
मोस्ट वाँटेड दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर बिथरलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी ‘किल इंडिया’ पोस्टर जारी केले होते. 8 जुलै राजी कॅनडात निज्जरच्या हत्येच्या विरोधात फ्रीडम रॅली आयोजित केली जाईल, असे या पोस्टरमध्ये नमूद आहे. तसेच पोस्टरवर कॅनडाच्या ओटावा येथील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा आणि टोरंटो येथील कॉन्स्युलेट जनरल अपूर्वा श्रीवास्तव यांचे छायाचित्र पोस्टरमध्ये ‘किलर्स इन टोरंटो’ अशा शीर्षकासह झळकविण्यात आले आहे.









