आष्टा/वार्ताहर
आष्टा पोलिसांनी वाळवा येथील शेत जमिनीत बेकायदेशीर व विनापरवाना लावलेली गांजाची 21 लहान मोठी झाडे हस्तगत केली.यावेळी गांजाची झाडे लावणाऱ्या इसमाला पकडत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल ही जप्त केले.पोलिसांनी एकूण 47 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईचे आष्टा परिसरात कौतुक होत आहे.
हर्षवर्धन सुभाष होरे(वय-३७)राहणार कोटभाग वाळवा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दोन किलो 900 ग्रॅम वजनाची 21 गांजाची हिरव्या रंगाची झाडे तसेच देशी बनावटीचे स्टीलचे पिस्तूल (मॅक्झिन असलेले) आणि एक पिवळसर धातूचा जिवंत राऊंड असा एकूण 47 हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.आष्टा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे अन्वये हर्षवर्धन होरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील,इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत,महेश गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक दिनकर महापुरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर साळुंखे,संजय सनदी,सुरज थोरात,अमरसिंह सूर्यवंशी,प्रवीण ठेपणे,दीपक भोसले,रूपाली पाटील, अश्विनी लुगडे यांनी ही कारवाई केली.अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम करीत आहेत.