बेळगाव : अन्न भाग्य योजनेतील तांदूळ तसेच अन्न व नागरी पुरवठा वितरणात केंद्र सरकार राज्य सरकारबाबत सापत्नभावाचे धोरण अवलंबित आहे. तांदूळ वितरणात पक्षपात करण्यात येत असल्याचा आरोप करत युवा काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष कार्तिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आरटीओ सर्कलमधील काँग्रेस भवन येथे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाने येऊन चन्नम्मा चौकात केंद्र सरकार राज्याला तांदूळ वितरण करण्यास नकार देत आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेला मोफत तांदूळ वितरण करण्यात सरकारला अडथळा निर्माण होत आहे. राज्यातील काँग्रेस सरकारबाबत पेंद्र सरकारने विरोधी भूमिका घेतली आहे. तांदूळ वितरणात केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला.
गरिबांच्या अन्नावर केंद्र सरकारचे राजकारण
केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून धोरणाचा कडाडून विरोध करण्यात आला. गोरगरिबांच्या अन्नावर केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकार गरिबांविरोधात भूमिका घेत आहे, असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौक आणि खासदार मंगला अंगडी यांच्या काडा येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यदर्शी बंटी शेळके, शंभूराजे देसाई, अब्दुल देसाई, यल्लाप्पा शिंगे, गोपाल दलवाई, अकिफ बेपारी आदी उपस्थित होते.









