अगसगे येथील शेतकरी बसाप्पा पाटील यांना सापडली आठ किलो वजनाची 15 रताळी
वार्ताहर /अगसगे
आपल्या आजुबाजूला वेगवेगळ्या आश्चर्यकारक घटना घडतात. असाच अचंबित करणारा प्रकार अगसगे शिवारात पाहावयास मिळाला. एका शेतकऱ्याला आपल्या शेतात चक्क आठ किलो वजनाची पंधरा रताळी मिळाली. याबाबत आश्चर्ययुक्त कुतूहल निर्माण झाले आहे. या रताळ्यांविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. चार दिवसांपासून पावसाला किरकोळ सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील भात पेरणी, बटाटा, भुईमुग, सोयाबिन, रताळी वेल लागवडीचे काम सुरू आहे. लागवडीसाठी रताळी वेल काढताना बसाप्पा कल्लाप्पा पाटील यांच्या शेतात तब्बल आठ किलो वजनाची पंधरा रताळी सापडली. बसाप्पा पाटील रताळी लागवड करण्यासाठी वेल काढत होते. त्यावेळी प्रत्येकी आठ किलो वजनाची सुमारे 15 रताळी सापडली आहेत. सर्वसामान्य रताळी अर्धा ते एक किलो वजनाची असतात. मात्र, बसाप्पा यांच्या शिवारात सापडलेली रताळी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये रताळी वेल लागवडीचे प्रमाण वाढले आहे. इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चात बऱ्यापैकी मिळत असलेल्या रताळ्यांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. निसर्गात वेगवेगळे चमत्कार घडत असतात. शेती पिकामध्येही अनोखा आश्चर्यकारक बदल पाहावयास मिळत आहे. अगसगे शिवारात पाहावयास मिळालेला हा निसर्गाचा चमत्कारच असावा, अशी चर्चा शेतकरीवर्गातून होत आहे.
पुढील उत्पादनाकडे लक्ष
सध्या रताळी वेलींची लागवड सुरू आहे. तीन महिन्यांनंतर या वेलींना रताळी कशी लागणार व उत्पादन किती मिळणार अशी चर्चा गावात रंगली आहे. मात्र, हे सर्व निसर्गावरच अवलंबून आहे. परमेश्वराच्या कृपेनेच आमच्या शेतात भली मोठी रताळी मिळाली आहेत. रताळी वेल काढत असताना आम्हाला ही रताळी पाहून विश्वास बसत नव्हता. कारण एवढी मोठी रताळी आम्ही याआधी पाहिलीच नाही. परमेश्वराच्या व निसर्गाच्या कृपेनेच आमच्या शिवारात आठ किलो वजनाची रताळी मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकरी बसाप्पा पाटील यांनी दिली.









