शेतकऱ्यांना हजर राहण्याचे सांगून अधिकारीच राहिले गैरहजर
वार्ताहर /उचगाव
बाची भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने रिंगरोडसाठी बळकावण्याचा खटाटोप गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे. या संदर्भात बाची भागातील सर्व शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून बुधवार दि. 5 जुलै रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र शासकीय अधिकारी आलेच नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाची परिसरातून रिंगरोडसाठी शेतवडीतून मार्किंग करण्यात आलेले आहे. सदर मार्किंग केलेल्या मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन आहे, की ज्या जमिनीमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. आणि याच जमिनीमधून अनेकांचे संसार चालवले जातात. त्याच जमिनीवर शासनाने डोळा ठेवून या सर्व जमिनी हडप करण्याचा खटाटोप गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवला आहे. याला अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला.
अनेकवेळा अधिकाऱ्यांना पिटाळले
मार्किंग करताना अथवा सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना पिटाळूनही लावले आहे. शासनाने अनेकवेळा रिंगरोडमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना बेळगाव कार्यालयामध्ये बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आलेले आहेत. सदर जमिनी रिंगरोडसाठी घेणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
शासनाकडून सूडबुद्धीने नाहक त्रास देण्याचा प्रयत्न
सोमवारी शासकीय अधिकारी येणार असल्याने सर्व शेतकरी, महिला या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी उपस्थित होत्या. मात्र सदर अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया गेला आहे. सध्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी शेतामध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी शासकीय अधिकारी विनाकारण या शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या सूडबुद्धीने नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारीही शेतकरी वर्गातून करण्यात येत आहेत. सोमवारीही असाच प्रकार झाला. सोमवारी शासकीय अधिकारी येणार म्हणून वाट पाहत थांबलेल्या शेतकऱ्यांना वाट पाहून अखेर जावे लागले. यासंदर्भात काय तो एकदा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शेतकरी एकत्र जमा झाले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने या सर्व शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. यावेळी तुरमुरी ग्रा. पं. माजी सदस्य गुडू गुंजीकर, एल. आर. मासेकर, रामलिंग गुंजीकर, सागर गुंजीकर, अजित गुंजीकर, शंकर गुंजीकर, श्रीकांत गुंजीकर याबरोबरच अनेक शेतकरी, महिला उपस्थित होत्या.









