वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील कल्लेहोळ फाट्यानजीक रस्त्याच्या दुतर्फा असलेला मोठा वृक्ष या महामार्गावर कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. बुधवार दि. 5 जुलै रोजी पहाटे कल्लेहोळ फाट्यानजीक रस्त्याच्या दुतर्फा असलेला मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी काही नागरिकांनी सदर वृक्षाचा काही भाग बाजूला सरकवल्याने या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या वृक्षाला रस्त्यापासून बाहेर काढावे आणि हा महामार्ग वाहतुकीला खुला करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सदर मार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावरतीच सदर वृक्ष कोसळल्याने वाहनांची बरीच कोंडी होत आहे. सध्या इथून एकेरी वाहतूक सुरू असल्याने प्रवासीवर्गाची कुचंबणा होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याकडे लक्ष घालून सदर कोसळलेला वृक्ष बाहेर काढावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









