वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला तीनपैकी एका बदलात वगळले आहे. 2-0 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत टिकून राहण्यासाठी हेडिंग्ले येथे आज 6 जुलैपासून सुरू होणारी तिसरी कसोटी जिंकणे आवश्यक आहे.
अँडरसनसह वेगवान गोलंदाज जोश टंग यांना विश्रांती देण्यात आली आहे, असे इंग्लंडने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अँडरसन आणि टंग यांच्या जागी मार्क वुड आणि सीम-गोलंदाजी करणारा अष्टपैलू ख्रिस वोक्स संघात आले आहेत. अॅशेसमधील आव्हान जिवंत ठेवण्याचे इंग्लंडचे लक्ष्य असल्याने फिरकी गोलंदाज मोईन अलीला संघात परत बोलावण्यात आले आहे. लॉर्ड्सवर खांदा निखळल्यामुळे उपकर्णधार ओली पोप उर्वरित हंगामातून बाहेर पडला असून मोईन अली पोपची जागा घेतली. हॅरी ब्रूकला आता पोपच्या स्थानी फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली आहे.
अँडरसनने कसोटी इतिहासातील कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा सर्वांत जास्त 688 बळी घेतलेले असले, तरी या स्विंग तज्ञाला आतापर्यंत या मालिकेत संघर्ष करावा लागलेला आहे. दुसरीकडे, टंगने गेल्या महिन्यात आयर्लंडविऊद्ध कसोटी पदार्पण करताना दुसऱ्या डावात पाच बळी मिळवून प्रभावित केले होते आणि लॉर्ड्सवर अॅशेसमध्ये पदार्पण करताना दोन डावांत पाच बळी घेतले होते.
इंग्लंडचा संघ-बेन डकेट, झॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, ज्यो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड.









