रोहित-विराटला विश्रांती : हार्दिककडे कर्णधारपदाची धुरा : तिलक वर्मा, यशस्वी जैस्वालला लॉटरी
वृत्तसंस्था/ मुंबई
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले असून सूर्यकुमार यादव उपकर्णधार असेल. विशेष म्हणजे, यंदाचा आयपीएल हंगाम गाजवलेल्या यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरिबियन बेटांवर आणि अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यानुसार भारतीय संघ निवडण्यात आला आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचे कसोटी आणि वनडे संघ यापूर्वी निवडण्यात आले होते. या दोन्ही संघांचे कर्णधारपद हे रोहितकडेच आहेत. या दौऱ्यात रोहित टी-20 संघाचे नेतृत्व करेल, असे वाटत होते. पण आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता रोहितसह विराट कोहली, रविंद्र जडेजा यांनी विश्रांती देण्यात आली आहे.

यशस्वी जैस्वाल, तिलक वर्माला लॉटरी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश झाल्यानंतर यशस्वी जैस्वालला टी-20 संघातही संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जैस्वालला लॉटरी लागली आहे. याचबरोबर मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मालाही टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. तिलकने आयपीएलच्या 16 व्या हंगामात 11 सामन्यात 164 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या. त्याचवेळी यशस्वीने 14 सामन्यात 625 धावा केल्या आहेत.
अर्शदीप, रवी बिश्नोईचे कमबॅक
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी टी-20 संघात पुनरागमन केले आहे. याचबरोबर कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करूनही उमरान मलिकला संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. याचबरोबर आवेश खान आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळाली आहे. तसेच इशान किशन आणि संजू सॅमसन असे दोन यष्टीरक्षक संघात असणार आहेत.
दरम्यान, 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय संघातील टी-20 मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरु होणार असून शेवटचा सामना 13 ऑगस्टला होणार आहे.
विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
टी-20 सामन्यांचे वेळापत्रक (सर्व सामन्यांची वेळ रात्री आठपासून)
- 3 ऑगस्ट, पहिला टी-20 सामना, त्रिनिदाद
- 6 ऑगस्ट, दुसरा टी-20 सामना, नॅशनल स्टेडिअम, गयाना
- 8 ऑगस्ट, तिसरा टी-20 सामना, नॅशनल स्टेडिअम, गयाना
- 12 ऑगस्ट, चौथा टी-20 सामना, फ्लोरिडा
- 13 ऑगस्ट, पाचवा टी-20 सामना, फ्लोरिडा









