व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नव्या कायद्याची मागणी
चीनमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे मुले आणि त्यांच्या आईवडिलांच्या अधिकारांवरून चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. या दु:खद घटनेत एका 6 वर्षीय मुलाने स्वत:च्या आईचा हातच्या मार टाळण्यासाठी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. देशात मजबूत बालसंरक्षण कायद्यांची गरज असल्याचे लोकांनी म्हटले आहे. पूर्व चीनमधील अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे.

घरात छडीचा प्रसाद मिळाल्यावर 6 वर्षीय मुलाने इमारतीबाहेरील एअर कंडिशनिंग युनिटवरून उडी घेतली. या घटनेचा व्हिडिओ चित्रण करणारा व्यक्ती आणि आसपासचे अन्य लोक संबंधित महिलेला मुलाला मारू नका असे आवाहन करताना दिसून येतात. परंतु याचा कुठलाच परिणाम न झाल्याने मुलाने अचानक इमारतीवरून उडी घेतली. ही क्लिप चीनच्या लोकप्रिय सोशल मीडिया साइट वीबोवर एक कोटीहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.
या मुलाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. मुलाने घरात यावे म्हणून आई त्याला छडीची भीती दाखवत होती, असे पोलिसांनी सोशल मीडिया साइटवर म्हटले होते. ऑल चायना वुमन फेडरेशनच्या एका सदस्याने देखील अशाच प्रकारचा दावा केला आहे. तर अशाप्रकारच्या स्पष्टीकरणांमुळे लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. आता हे प्रकरण गुंडाळण्याचा पूर्ण प्रयत्न होत असल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे.









