पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यापुढील काळातही शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे दिली.
बैठकीस खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी यांच्यासह मोठय़ा संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जगताप म्हणाले, पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठय़ा संख्येने शरद पवार यांच्यासोबत आहे. पवार यांचे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. त्यांना पाठिंबा देण्याबाबत ठराव बैठकित मांडण्यात आला आहे. कायदेशीर पातळीवर लढाई पोहचली असल्याने प्रतिज्ञापत्रावर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे घेतले जाणार आहे.
जिल्हय़ातील आणि शहरातील सर्व आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहे. सर्वांना मेसेज दिले. त्यांनी बैठकीस येणे आपेक्षित होते. परंतु वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघे कामात व्यस्त असल्याने बैठकीस येऊ शकले नाहीत. पुणे पक्ष कार्यालय हे प्रशांत जगताप या माझ्या नावाने करारबद्ध आहे. त्यामुळे बळजबरीने त्याचा ताबा कोण घेऊ शकणार नाही. राष्ट्रवादीचे नाव सदर करारात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघ आणि भाजप विरोधात आम्ही यापुढे काम करत राहणार आहे. जे मंत्रिमंडळात आमचे सहकारी सहभागी झाले, त्यांच्याविरोधात आम्हाला यापुढे आंदोलन करावे लागेल. अद्याप कोणाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले नाही. 23 माजी नगरसेवक बैठकीत उपस्थित होते. मी विचारसरणीविरोधात जाणार नाही, याचा निर्णय घेतला असल्याचेही जगताप यांनी सांगितले.








