18 जुलैपासून 18 दिवसांचे अधिवेशन
पणजी : येत्या 18 जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आतापर्यंत 1108 प्रश्न आले आहेत. हे अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनासाठी विधीमंडळ खात्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये 272 तारांकित आणि 836 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. मात्र आतापर्यंत एकही सरकारी किंवा खाजगी विधेयक दाखल झालेले नाही. अधिवेशनास अद्याप 15 दिवस बाकी असल्यामुळे त्या कालावधीत सरकारी किंवा खाजगी विधेयके आणि ठराव दाखल होऊ शकतात, अशी माहिती विधीमंडळ खात्याकडून प्राप्त झाली आहे.
हल्लीच्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून किमान 20 दिवस कालावधीचे तरी अधिवेशन असावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यानुसार यंदा प्रारंभी 20 दिवसांचेच अधिवेशन जाहीर करण्यात आले होते. परंतु अचानक त्यातील दोन दिवस घटवून ते 18 दिवसांचे करण्यात आले. या प्रकाराबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. 18 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी सोमवारपासून प्रश्न स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार विधीमंडळ खात्याकडे सध्या रोज सुमारे 190 प्रश्न दाखल होत आहेत. अधिवेशनची तारीख जवळ येत जाईल तशी प्रश्नांची संख्या वाढत जाणार आहे. त्यानंतर दाखल झालेल्या प्रश्नांसह विधेयके, तसेच विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कार्यक्रम निश्चित होणार आहे. या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.









