बेंगळूर :
इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाचे तसेच भारतीय फुटबॉल संघातील हुकमी विंगर लालियाझुआला छांगटे याची 2022-23 च्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. तर महिलांच्या विभागात पंजाबच्या मनीषा कल्याणची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून घोषणा केली आहे. इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेच्या गेल्या हंगामात मुंबई सिटी एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करताना मिझोरमच्या 26 वर्षीय छांगटेने 12 सामन्यात भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले असून या फुटबॉल हंगामात त्याने 2 गोल नोंदवले आहेत. या पुरस्कारासाठीच्या शर्यतीत छांगटे, नंदकुमार शेखर अणि नाओरेम महेश सिंग यांचा समावेश होता.
पण छांगटेने या दोन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. मिझोरामचा छांगटे सध्या बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. छांगटेने मुंबई सिटी एफसीचे 22 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने गेल्या फुटबॉल हंगामात 10 गोल नोंदवले होते. गेल्या वर्षीच्या ड्युरँड चषक फुटबॉल हंगामात छांगटेने 7 गोल केले होते. सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत त्याने 3 सामन्यात एक गोल केला होता.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या येथे मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये पंजाबची आघाडी फळीत खेळणारी 21 वर्षीय मनीषा कल्याण हिची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. मनीषा कल्याणने या पुरस्कारासाठीच्या शर्यतीतील प्रतिस्पर्धी दालिमा चिबेर तसेच एन. स्वीटी देवी यांना मागे टाकले आहे.









