तुरुंगातून चालवत होते गुन्हेगारी टोळी : एनआयए उचलणार ठोस पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील तुरुंगांमध्ये कैद सुमारे 25 गँगस्टर्सना अन्य तुरुंगांमध्ये हलविण्याची तयारी एनआयए करत आहे. एनआयएने या गँगस्टर्सना अन्यत्र हलविण्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. हे सर्व गँगस्टर्स तुरुंगातून स्वत:चे सिंडिकेट चालवत असल्याचा एनआयएचा आरोप आहे. या यादीत सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणी आरोपी असलेला गँगस्टर लॉरेन्सचे नाव देखील सामील आहे.
एनआयएने केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात उत्तर भारतातील तुरुंगातून 25 गँगस्टर्सना दक्षिणेतील राज्यांच्या तुरुंगांमध्ये हलविण्याची विनंती केली आहे. एनआयएने प्रारंभी गँगस्टर्सना दक्षिणेतील राज्यांमध्ये पाठविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु याकरता राज्य सरकारांशी संपर्क साधून नियमांची पूर्तता करण्यास मोठा कालावधी लागू शकतो.
पर्यायाच्या स्वरुपात एनआयए आसामच्या डिब्रूगढ येथील मध्यवर्ती कारागृहात या गँगस्टर्सना हलविण्याचा विचार देखील करत आहे. याच तुरुंगात खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह आणि त्याचे साथीदार कैद आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटसमुहातील तुरुंगात या गँगस्टर्सना कैद करण्याची शक्यता अधिक आहे. अंदमान आणि निकोबार हे केंद्रशासित असल्याने तेथे या गँगस्टर्सना हलविण्याची प्रक्रिया सोपी अन् कमी वेळ घेणारी ठरणार आहे. एनआयए याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहे.
एनआयएने काही दिवसांपूर्वी पंजाब, चंदीगड आणि हरियाणा पोलिसांसोबत मिळून संयुक्त पथक स्थापन केले आहे. गँगस्टर्सकडून निर्माण करण्यात आलेले सिंडिकेट रोखणे हा यामागील उद्देश आहे. एनआयएने मागील वर्षी ऑगस्टमध्ये गँगस्टर्सविरोधात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यात भारतातील आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीकडून अवैध मार्गाने रक्कम जमविणे, दहशतवादी हल्ल्यांसाठी युवकांना भरती करणे आणि गंभीर गुन्हे घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप नमूद आहे.









