मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती ; केंद्रीय योजनांच्या लाभाचा घेतला आढावा
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या गोव्यातील विविध योजनांचा आढावा घेतला. त्याचबरोबर एकूण रु. 943 कोटी रकमेच्या 70 प्रकल्पांचे सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातील 42 अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आले असून ते मंजूर होतील, अशी खात्री त्यांनी वर्तवली आहे. डॉ. सावंत यंनी सर्व खात्याचे प्रमुख व संचालक तसेच सचिव यांची संयुक्त बैठक पर्वरी येथील मंत्रालयात काल सोमवारी घेतली. त्यात केंद्र सरकारच्या योजनांची गोव्यातील परिस्थिती, यावर चर्चा केली. मुख्य सचिव पुनितकुमार गोयल हे उपस्थित होते. प्रत्येक खात्याचा स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. गोव्यात केंद्राच्या किती योजना चालू आहेत, आणखी किती योजना राबवता येतील, यावर विचार झाला तसेच त्यांचा एकंदरीत आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या जास्तीत जास्त योजना गोमंतकीय जनतेसाठी राबवण्यात बैठकीत भर देण्यात आला. त्यांची चांगली कार्यवाही गोमंतकीय जनतेसाठी व्हावी. त्या योजनांचा सर्वाधिक लाभ गोमंतकीय जनतेला मिळावा या हेतूने हा आढावा घेण्यात आल्याचे डॉ. सावंत यंनी नमूद केले. रु. 227 कोटीचे 42 अहवाल केंद्राला पाठवण्यात आले असून त्यांना लवकरच मान्यता मिळेल, असे त्यांनी सांगितले.









