पुणे / प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यातील 9 आमदारांपैकी अतुल बेनके, अशोक पवार, चेतन तुपे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदारांना खेचण्याचा अजितदादांचा प्रयत्न फोल ठरला आहे.
राष्ट्रवादीच्या अभूतपूर्व फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील समीकरणे बदलल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार आहेत. आंबेगावात दिलीप वळसे पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, खेड राजगुरूनगरचे दिलीप मोहिते, शिरूरचे अशोक पवार, हडपसरचे चेतन तुपे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनील शेळके, इंदापूरचे दत्तात्रेय भरणे व बारामतीतून स्वत: अजित पवार पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. यातील पवार व शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दिलीप मोहिते यांनी आपण अजितदादांसोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. अण्णा बनसोडे, सुनील शेळके, दत्ता भरणे हे दादा समर्थक म्हणूनच ओळखले जातात. मात्र, अतुल बेनके, अशोक पवार व चेतन तुपे यांचा शरद पवार यांच्या बाजूने कौल असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, पुढच्या दोन ते चार दिवसांतच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
रुपाली चाकणकर, रुपाली पाटीलही दादा गटात
दुसऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनीही दादांना साथ देणे पसंत केले आहे. मात्र, राष्ट्रवादीतील जुने जाणते नेते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड हे पवारांसोबत असल्याचे चित्र आहे.








