बंद घराचा कडीकोयंडा तोडून 10 लाखाचा ऐवज लंपास : श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. टी. व्ही. सेंटर परिसरातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून 10 लाखाचा ऐवज पळविण्यात आला आहे. रविवारी रात्री चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. यासंबंधी हजरत पाशा कालेपिरजादे यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांचे बंधू डॉ. मोहसीन कालेपिरजादे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. दि. 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आपल्या घराला कुलूप लावून डॉ. मोहसीन व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त रायबाग तालुक्यातील कुडचीला गेले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय कुडचीहून घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. जिन्यावरील ग्रीलला लावलेले कुलूप फोडून चोरटे पहिल्या मजल्यावर पोहोचले आहेत. दरवाजाचा सेंटर लॉक फोडून घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. बेडरूममधील तिजोरी फोडून सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम, 7 लाख रुपये किमतीचे 175 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये किमतीची पाच मनगटी घड्याळे असा एकूण 10 लाख 30 हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.
खबरदारी आवश्यक
बंद घरे गुन्हेगारांचे लक्ष्य बनत आहेत. गेल्या एक-दोन महिन्यांपासून बेळगाव शहर व उपनगरातील बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत असून यापूर्वी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सुरक्षिततेविषयी अनेकवेळा आवाहन केले आहे. घराला कुलूप लावून परगावी जाताना शेजाऱ्यांना किंवा जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी. रात्रीच्यावेळी बाहेरचे लाईट सुरू राहतील, याची खबरदारी घ्यावी. दूध, वृत्तपत्रे शेजाऱ्यांना घ्यायला लावावीत. अशा गोष्टींमुळेच गुन्हेगारांना घरात कोणी नाही, याची माहिती मिळते. त्यामुळे परगावी जाताना खबरदारी घ्यावी. दागिने लॉकरमध्ये ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.









