आम्हाला न्याय द्या, गुंडांपासून संरक्षण करा : बेकिनकेरे ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आरोपींवर कारवाईची मागणी
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेती करत आहे. या जमिनीचा वाद न्यायालयात आहे. असे असतानाही अचानकपणे गुंड घेऊन महिला, लहान मुलांना व शेतकऱ्यांना जबर मारहाण केली. मारहाण केल्यानंतर काकती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यामुळे संपूर्ण बेकिनकेरे गाव भयभीत झाले असून राजकीय दबाव घालून अशाप्रकारे शेती बळकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेकिनकेरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेकिनकेरे-गोजगा मार्गावर शेतकरी भातपेरणी करत असताना अचानक काहीजणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना बेकिनकेरे येथे गुऊवारी घडली होती. जोतिबा सावंत, राजू सावंत, पुंडलिक सावंत, सुनीता पुंडलिक सावंत, कविता राजू सावंत, वनिता जोतिबा सावंत, अभिषेक पुंडलिक सावंत, कार्तिक राजू सावंत, श्री राजू सावंत, विघ्नेश्वर जोतिबा सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली. सदर जमिनीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. अद्याप त्याचा निकाल नाही. मात्र अचानकपणे अशाप्रकारे हल्ला करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामध्ये शेतकरी, लहान मुले आणि महिलादेखील जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्यांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. राजकीय दबाव घालून अशाप्रकारे दमदाटी केली जात आहे. बेकिनकेरेच नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. तेव्हा संबंधित गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
60 ते 70 जणांकडून हल्ला
गोजगा येथील सर्व्हे क्रमांक 85/1, 85/2 ही जमीन संबंधित शेतकऱ्यांकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कब्जा असून हे कुटुंबीय त्या जमिनीतून उत्पन्न घेत आहे. मात्र यावर्षी अचानकपणे भातपेरणी करताना हा हल्ला झाला. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अचानकपणे 60 ते 70 जणांना घेऊन हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. जमिनीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसांना दाखल करता येतो. त्यांच्या मुसक्यादेखील आवळणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपचे नेते धनंजय जाधव, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष अर्जुन डोंबले, माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे, निंगाप्पा सावंत, मारुती भोगण, मारुती सावंत, अर्जुन सावंत, बाळू बिर्जे, प्रकाश भोगण, पुंडलिक भोगण, दत्तु सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









