रिंगरोडसंदर्भात चर्चेसाठी केले होते आवाहन : बैठकीला अधिकारीच न आल्याने सर्वांची गोची
वार्ताहर /उचगाव
उचगाव भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी रिंगरोडसाठी हडप करण्याचा खटाटोप गेल्या अनेक वर्षापासून शासनाने सुरू केला आहे. या संदर्भात उचगाव भागातील सर्व शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र शासकीय अधिकारी आलेच नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रिंगरोडसाठी उचगाव परिसरातील शेतवडीतून मार्किंग करण्यात आले. या मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांची हजारो एकर सुपीक जमीन, ज्यावर अनेकांचे संसार चालवले जातात, त्याच जमिनी हडप करण्याचा खटाटोप गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवला आहे. याला अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला, मार्किंग करताना आणि सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना पिटाळूनही लावले. शासनाने अनेकवेळा रिंगरोड मार्गामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना बेळगाव कार्यालयामध्ये बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तरीही रिंगरोडसाठी जमीन हडप करण्याचा खटाटोप सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांची निराशा
सोमवारी शासकीय अधिकारी येणार असल्याने सर्व शेतकरी, महिला या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी उपस्थित होत्या. मात्र सदर अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया गेला. सध्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास
अशावेळी शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. सोमवारीही असाच प्रकार झाला. शासकीय अधिकारी येणार म्हणून वाट पाहत थांबलेल्या शेतकऱ्यांना अखेर माघारी फिरावे लागले. या संदर्भात कायमचा तोडगा काढण्यासाठी शेतकरी एकत्र जमा झाले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने सदर प्रश्न जैसेच राहिला आहे. यावेळी उचगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोहर कदम, रामा कदम, शंकर होनगेकर, वामन कदम, शिवाजी चौगुले, शंकर कदम, शंकर पावशे, पुन्हाजीचे, होनगेकर याबरोबरच अनेक शेतकरी, महिला यावेळी उपस्थित होत्या.









