कंग्राळी बुद्रुकच्या रस्त्याकडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी : प्रवाशात तीव्र संताप : मनपाने दखल घेण्याची गरज
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा काढला जातो. तो कचरा महानगरपालिका क्षेत्रातील घरांचा असल्याने मनपा हद्दीतच टाकण्याची आवश्यकता असते. मात्र तसे न करता कचरा व सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये टाकला जातो. हे थांबविण्यासाठी अनेकवेळा अर्ज, विनंत्या, वृत्तपत्रामधून वृत्त प्रसिद्ध करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी या भागातील लोकप्रतिनिधांनीच लक्ष देऊन ग्रामीण हद्दीत कचरा टाकणे बंद करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी करण्यात येत आहे. गावच्या उत्तरेला शाहूनगर, आझमनगर ही उपनगरे आहेत. या उपनगरातील सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये सोडले. त्यावेळेला सांडपाण्याबद्दल वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमध्ये महानगरपालिकेने कुणाचाही विचार न करता सांडपाणी सोडून आपला मार्ग मोकळा केला. परंतु यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण, ‘शासन की लोकप्रतिनिधी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपाने कचरा कुंड ठेवणे गरजेचे
घर बांधतेवळी किवा अन्य कामे करताना नियमानुसार महानगरपालिका कार्यालयामध्ये कर भरल्यानंतर घर बांधणीची परवानगी देण्यात येते. परंतु पुढील सुविधा देण्याकडे मनपा दुर्लक्ष करते. कारण कित्येक वर्षापासून कंग्राळी हद्दीत सांडपाणी तर येतेच शिवाय उपनगरातील रोजचा कचराही गावच्या मुख्य रस्त्याकडेला टाकूण दुर्गंधी पसरविण्याचे काम करत आहेत. तेव्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी या उपनगरामध्ये ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवून रस्त्याकडेला कचरा टाकण्यास मनाई करावी अशी मागणी होत आहे.
नागरिकांचेही सहकार्य गरजेचे
आज जो तो शासनाच्या नावाने बोटे मोडत असतो. परंतु शासनाला आपण किती सहकार्य करतो याकडे लक्ष देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण आपण तसे करत नसल्याने त्याला आपणही तितकेच जबाबदार आहोत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज जो तो येतो कचरा कुठेही फेकतो. अन् निघून जातो. पण, त्यामुळे तेथील परिसर अस्वच्छ बनेल याचा जरासुद्धा विचार करत नाही. त्यामुळे अस्वच्छतेला वाव मिळतो. प्रत्येकाने स्वत:च्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावली तर इकडे-तिकडे कचरा टाकण्याची समस्याच निर्माण होणार नाही. यासाठी स्वत:च्या घरापासून ‘स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे’ या घोषवाक्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने आपल्या कचऱ्याची आपणच योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शासन कचरा समस्या सोडविणार कधी ?
आज शहर, उपनगरे व ग्रामीण भागामध्ये कचरा समस्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. वाढत्या लोकवस्तीमुळे घरोघरी कचरा वाढत राहणारच. कुंडामध्ये टाकलेल्या कचऱ्याची उचल शासनाने रोजच्या रोज केल्यास कुठेही कचरा दिसणार नाही. परंतु यासाठी शासनाचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कचरावाहू वाहनासह कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.









