वृत्तसंस्था/ दुबई
ग्लोबल चेस लीगच्या दुबई येथे झालेल्या पहिल्या स्पर्धेची शानदार पद्धतीने समाप्ती झालेली असून एखाद्या बुद्धिबळ स्पर्धेत कधीही पाहिली गेलेली नाही इतकी चुरसपूर्ण अंतिम लढत यावेळी पाहायला मिळाली. जलद बुद्धिबळच्या दोन फेऱ्या आणि नंतर ‘ब्लिट्झ’च्या आणखी दोन फेऱ्याही बरोबरीत सुटल्यानंतर ‘सडन डेथ ब्लिट्झ गेम्स’च्या माध्यमातून सोक्षमोक्ष लावण्यात आला. त्यात निर्णायक निकाल चौथ्या गेममध्ये येऊन त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स संघला विजेतेपद प्राप्त झाले.
नेत्रदीपक समाप्तीमध्ये डेन्मार्कचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर जोनास बजेरे याने त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सला विजय मिळवून देताना उझ्बेकच्या 17 वर्षीय जावोखीर सिंदारोव्हचा पराभव केला. खरे तर बजेरे हा स्पर्धेतील सर्वांत अननुभवी खेळाडूंपैकी एक होता आणि त्याने बहुतेक लढती गमावल्या होत्या. मात्र ऐन क्षणी त्याने आपल्या संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. सिंदारोव्हसमोर चार पराभव पत्करावे लागल्यानंतर या लढतीत मात्र बजेरेने बाजी पालटविली. या विजयासह बजेरेने केवळ त्याच्या संघाला विजेतेपदच मिळवून दिले नाही, तर 5 लाख डॉलर्सचे बक्षीसही पटकावून दिले. या स्पर्धेसाठी ठेवलेल्या एकूण बक्षिसांची रक्कम 10 लाख डॉलर्स इतकी होती.
जगातील सर्वांत बलाढ्या ग्रँडमास्टर्सपैकी एक लेव्हॉन अरोनियन याच्या नेतृत्वाखालील त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स आणि 2021 चा जागतिक ब्लिट्झ विजेता मॅक्झिम व्हॅचियर-लॅग्रेव्ह याच्या नेतृत्वाखालील मुंबा मास्टर्स यांच्यात ही अंतिम लढत झाली. अंतिम फेरीत दोन जलद लढतींचा समावेश होता आणि पहिल्या सामन्यात त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सने 9-7 ने विजय मिळविला. यातील महत्त्वाच्या लढतीत लेव्हॉन अॅरोनियनने मॅक्झिम व्हॅचियर-लॅग्रेव्हचा गेममध्ये पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात मुंबा मास्टर्सने आत्मविश्वासाने पुनरागमन करताना त्रिवेणीचा 12-3 अशा फरकाने पराभव केला.
त्यानंतर दोन लढतींची ‘ब्लिट्झ’ फेरी खेळविण्यात आली. त्यातील पहिल्या लढतीत मुंबाने 14-5 असा, तर दुसऱ्या लढतीत त्रिवेणीने 13-7 असा विजय मिळविला. येथेही बरोबरी झाल्याने शेवटी ‘सडन डेथ’चा आधार घ्यावा लागला. त्यात सारा खादेम आणि भारताच्या हरिका द्रोणवल्ली तसेच अलेक्झांडर ग्रिस्चुक आणि यू यांगई यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. कॅटेरिना लॅग्नो आणि भारताची कोनेरू हंपी यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटल्याने चुरस आणखी वाढली. चौथ्या लढतीत सिंदारोव्हने सुरुवातीला वर्चस्व गाजविले, पण बजेरेने दाद दिली नाही. सिंदारोव्हने सामना बरोबरीत सोडविण्यास नकार देऊन पुढे खेळणे कायम ठेवले. पण हा पवित्रा अंगलट येऊन त्याला शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले. किंग ऑफ दि मॅच पुरस्कार बजेरे, क्वीन ऑफ दि मॅच कॅटेरिना लाग्नो, तर किंग ऑफ दि सिरीज एसजी अल्पाईन वॉरियर्सच्या प्रज्ञानंदला आणि क्वीन ऑफ दि सिरीज पुरस्कार बालन अलास्कन नाइट्सच्या तान झोंगईला प्राप्त झाला.









