विविध धोरणांशी संबंधित मुद्यांवर विचार विनिमय झाल्याचे पंतप्रधानांचे ट्विट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सोमवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशासंबंधीच्या विविध विषयांवर व्यापक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. येथील प्रगती मैदानाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी “सहकारी मंत्र्यांसोबत एक फलदायी बैठक पार पडली असून आम्ही त्यात विविध धोरणांशी संबंधित मुद्यांवर विचार विनिमय केला,” असे ट्विट करत काही छायाचित्रेही शेअर केले आहेत.
या बैठकीपूर्वी भाजपच्या नेत्यांना अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता ही प्रदीर्घ बैठक झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणाऱ्या असल्याच्या चर्चेला माध्यमांमध्ये प्रारंभ झाला आहे. मात्र, तसा कोणताही संकेत या बैठकीनंतर देण्यात आलेला नाही. बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने विविध अनुमाने व्यक्त होत आहेत.
देवेंद्र फडणवीस केंद्रात?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक महाभूकंप रविवारी झाल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या वेळी सध्या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्री केले जाण्याच्या शक्यतेची चर्चा होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला जाईल, अशी शक्यता आहे. मात्र, फडणवीस महाराष्ट्रातच राहतील, असेही अनेक नेते ठासून सांगत आहेत.
मित्रपक्षांना सामावून घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाच तर, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, हे निश्चित मानले जात आहे. या मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेचा अजित पवार गट यांचा समावेश असेल. भाजपच्या काही राज्यशाखांचे नवे अध्यक्षही नियुक्त केले जाऊ शकतात. यासंबंधी येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे.









