समृद्धी महामार्गावर झालेल्या भयंकर अपघातात शनिवारी पहाटे 25 प्रवाशांचा खाजगी बस उलटून पेट घेतल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या महामार्गावर सहा महिन्यात साडेचारशे अपघात होऊन शंभर लोकांचे बळी गेले आहेत. या महामार्गाचे काम करणारे, श्रेय घेणारे, रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस सर्वजण आधी दोष देतात ते बेदरकार वाहन चालवले म्हणूनच. पण आपण गतीने रस्ता करण्याच्या नादात बेदरकार काम करून गाड्यांच्या टायर फुटेपर्यंत कोठेही विसावा न घेता वाहन चालकांना धावायला लावले आहे, ही आपली चूक आहे हे मात्र ते मान्य करत नाहीत. देशात अनेक महामार्ग आहेत पैकीच हा एक आहे आणि इथेच सतत का अपघात होतात याचे आत्मपरीक्षण महाराष्ट्र सरकारने करण्याची गरज आहे. लोकांमध्ये संतापाची भावना इतकी आहे की, राज्यात अजित पवार आणि आठ मंत्र्यांचा शपथविधी सुरू असलेला फोटो आणि त्याच दिवशी बुलढाण्यामध्ये मृत वीस प्रवाशांचा सामूहिक अंत्यसंस्काराचा फोटो एकत्र जोडून शपथविधी आणि अंत्यविधी असा टोकाचा विरोध करणारा संदेश लोक व्हॉट्सअप वरून फिरवत होते. अर्थात हा संदेश कोणीतरी आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या बदनामीसाठी बनवला असेल हे नक्कीच. पण लोकांना यातील विसंगती पटली आणि त्याबाबतचा संताप त्यांनी हा मजकूर पसरवून व्यक्त केला. याकडे कानाडोळा करता येणार नाही. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताबाबत विविध प्रकारचे अभ्यास आणि माहिती पुढे येत आहे. वाहनचालक सतत एक सारखा बघत सरळ रस्त्याने वाहन पळवत राहिला तर कुठे ना कुठे तो संमोहित अवस्थेत जाऊ लागतो आणि त्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकून अपघात होतो. सरळसोट रस्त्याचा हा सगळ्यात मोठा धोका आहे. वळणांच्या रस्त्यावरून जाताना चालक जागृत राहून वाहन चालवू लागतो आणि विसाव्याच्या ठिकाणी थांबल्याने त्याला, त्याच्या वाहनाला विश्रांती मिळते. या थोडावेळाच्या कामातील बदलाने अपघात होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र या वास्तवाकडे लक्ष देण्याची तयारी सरकार दर्शवत नाही. इतरांची वाहने वेगाने जातात असे म्हणणाऱ्या सरकारने आपलेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा या रस्त्यावरून वाहन चालवत होते तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग किती होता? याचा विचार केल्यास ते इतरांना दोष देणे थांबवतील. अपघातग्रस्त वाहन हे अगदी नव्याने खरेदी केलेले, अलीकडचे म्हणजे दोन वर्षांपूर्वीचे आहे. त्याचा विमा आणि सर्व कागदपत्रात कोठेही खोट काढायला जागाच नाही. अशावेळी ते दोष देणार कोणाला हा प्रश्न आहे. समृद्धी महामार्ग ज्या अविकसीत भागातून गेला आहे तिथे समृद्धी यायला अजून बराच वेळ लागेल. सामान्य शेतकरी भांडवल घालून वाहनांच्या विसाव्याची सोय करू शकत नाहीत. ज्या मोठ्या भांडवलदारांनी तिथे जमिनी घेतल्या ते आता लगेच उघड व्हायला तयार नाहीत. त्यामुळे हा महामार्ग एकदम कंटाळवाणा आणि विनाकारण न थांबता धावायला लावतो. अशी वाहन चालकांची तक्रार आहे. हे रस्तेही डांबरी नसून सिमेंटचे असल्यामुळे वाढणारी उष्णता आणि टायरचे घर्षण होऊन ते फुटतात. 120 पेक्षा अधिक गतीने धावणारे वाहन सलग धावत
राहिले तर याहून वेगळे काय होणार. या कामाच्या दर्जाबाबतही लोकांना शंका आहे. कारण, या मार्गावरील दिशादर्शक कमानी कोसळून सुद्धा अपघात झालेले आहेत आणि त्यात लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मूळ डिझाईनमध्ये बदल करून बुलढाणा जिह्याच्या ज्या भागात रस्ते करण्यात आले आहेत, त्याच भागात हा अपघात झाला आहे. या बदलाचा फटकासुद्धा वाहनाला बसला असण्याची शक्यता आहे. अर्थात या प्रकरणात रस्ते बांधणी करणाऱ्या कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता नाही. कारण त्यांचे लागेबांधे मंत्रालयातील अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांशी जुळलेले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अशा दुर्घटना त्यांचे घर उध्वस्त करणाऱ्या ठरतात. मात्र मोठमोठ्या प्रकल्पातून रस्ते बांधणी आणि इतर व्यवस्था उभा करणाऱ्यांना लोकांच्या या भावनेशी काहीही देणेघेणे नसते. सरकारने यातील दोष दूर करावेत तर या रस्त्यांची पाहणी करणारे अधिकारीही सरकारीच होते तेव्हा त्यांच्यावर ठपका ठेवायचा तर आपल्याच भावकीला अडचणीत आणल्यासारखे. मग अशावेळी केवळ वेळकाढूपणा केला जातो. लोक सगळे काही विसरल्यानंतर त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न होतो. मात्र प्रत्यक्षात इथे सहा महिन्यात साडेचारशे अपघात झाले असतील आणि त्यात शंभर लोकांचा बळी गेला असेल तर लोकांना कुठल्या कुठल्या घटनेचे विस्मरण होणार? कोणाची तरी चूक दाखवणे हा केवळ सरकारी चौकशीचा उद्देश नसतो. तर ती चूक आधी सुधारणे आणि त्यानंतर कारवाईबाबत विचार करणे अपेक्षित असते. रस्ते विकास महामंडळ याबाबत काही विचार करायला तयार नाही. देशातील अनेक महामार्ग बनवण्याच्या विक्रमाची नोंद नितीन गडकरी यांच्या नावावर आहे. त्यांचा पहिल्यापासून या रस्त्याच्या कामात सहभाग नसल्याचे दाखवून देणाऱ्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. आता ज्यांचा सहभाग होता त्यांनी किमान ही चूक दुरुस्त करण्यासाठी तरी पुढे येणे आवश्यक होते. श्रेय घेतले आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही तर अपश्रेयही आपोआप पदरात पडते. मुंबई-पुणे महामार्ग नितीन गडकरी यांनी जेव्हा बनवला तेव्हा त्यातही त्रुटी होत्या. तिथे झालेल्या अपघातांनंतर त्या दूर करण्यात आल्या. मात्र इतक्या मोठ्या महामार्गाबाबत तसाच कोणताही निर्णय घेतला नसल्याने भविष्यात वाहन चालक या रस्त्याला जायचे की नाही याचा विचार करू लागतील. गतीने पोहोचण्यापेक्षा आपला जीव प्रिय आहे हे जाणणारे प्रवासी जर या रस्त्यावरून जायचे कमी झाले तर समृद्धी महामार्ग ही एक समृद्ध अडगळ बनून जाईल. पुण्यात घाईने केलेल्या मेट्रोचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. पुण्यापासून पिंपरीपर्यंत अनेकदा मेट्रो मोकळी धावत असते. याचे कारण तिथली गरज आणि लोकांना त्यासाठी जोडून घेण्याचा विचारही रेल्वे धावण्यापूर्वी झाला नाही. हेच समृद्धीबाबतही झाले असून तातडीने त्रुटी दूर करणे हीच या 25 आणि एकूण 100 मृतांना श्रध्दांजली असेल.








