ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे, अशी टीका भाजप आ. नितेश राणे यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, 2019 साली जनमताचा अपमान करत मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने उद्धव ठाकरेंनी भाजपला दगा देऊन राजकारणाचा चिखल केला. तेच आज भाजपवर टीका करत अकलेचे तारे तोडत आहेत हे हास्यस्पद आहे. तुम्ही जे 2019 साली केले तो महाराष्ट्र धर्म होता, मात्र आम्ही जे केले तो महाराष्ट्र द्रोह असे बोलण्यास जीभ धजावते कशी? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, राऊत यांच्या घाणेरडय़ा राजकारणामुळे महाराष्ट्रात ही स्थिती उद्भवली. अजित पवारांच्या शपथविधीनंतर समाधान मिळाल्याने राऊत यांचा आत्मा शांत झाला असावा. पवारांनंतर आता संजय राऊत यांचे पुढचे लक्ष्य हे काँग्रेसमध्ये फूट पाडणे हे असल्यानेच सातत्याने नाना पटोले यांना लक्ष्य केले जात आहे, असेही ते म्हणाले.