ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शेवटच्या फेरबदलात रविशंकर प्रसाद, डॉ. हर्ष वर्धन आणि प्रकाश जावडेकर यांना वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि पुरुषोत्तम रुपाला यांना बढती देण्यात येण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली. संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली होती. मंत्रिमंडळातील कोणताही फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदलांविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमधील सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली थोडय़ाच वेळात मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. त्यामध्ये यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.