ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 35 समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या संपूर्ण घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी या प्रकरणावर वेगळीच शंका उपस्थित केली आहे. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर नवल वाटायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले, राज्यातील राजकारण रसातळाला गेलं आहे. दोन अडिच वर्षात तर हे राजकारण किसळवाणं झालं. राजकारण्यांना मतदारांशी काही देणंघेणं नाही. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या ज्येष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. हे तिन्ही नेते शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त होत आहे. सर्वसामान्य या सर्व गेष्टींचा विचार करणं गरजेचं आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्यानेही अजित पवारांना साथ दिली आहे. हे मनाला पटत नाही. ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्याशिवाय पटेल, भुजबळ यांच्यासारखे नेते अजित पवारांसोबत जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्रीही होऊ शकतात. मग नवल वाटायला नको. मी थोडय़ाच दिवसात मेळावा घेऊन याबाबत बोलणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.