वीजबिलाचा बोजा कमी करण्यासाठी घेतला निर्णय : मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा निर्मितीचा विचार
वार्ताहर /मच्छे
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) भरमसाट वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी आपल्या कॅम्पस इमारतींच्या छतावर ‘सोलर पॅनेल’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीटीयूचे बेळगावात 378 एकरात कॅम्पस विस्तारले आहे. व्हीटीयूला दरमहा सरासरी 30 ते 35 लाख रुपये वीजबिल येत होते. अलीकडे दर वाढले आहेत. मे महिन्याच्या बिलाची रक्कम 30 लाख रुपये होती. एप्रिल महिन्याचे वीजबिल 20 लाख आले होते. वीजबिलाचा हा खर्च कमी करण्यासाठी व्हीटीयूने बेळगाव कॅम्पसमधील विविध विभाग, प्रशासन कार्यालय, गेस्ट हाऊस आणि वसतिगृहांच्या छतांवर सौर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पादनाचा विचार
राज्यातील इतर सरकारी संस्थांमध्ये सध्या छतांवर सौर पॅनेल आहेत. व्हीटीयू सरकारी मालकीच्या किंवा गैरसरकारी मालकीच्या कंपन्यांना निविदा जारी करण्याचा विचार करत आहे. सध्या राज्यात कर्नाटक रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ख्RDिंथ्) अशाप्रकारे सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. व्हीटीयू तेथून मिळू शकणाऱ्या सवलतीचाही विचार करत आहे. जर विश्वविद्यालयाने मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेची निर्मिती केली तर उर्वरित वीज विकण्याचाही त्यांचा विचार आहे.
यूजीसीकडे लक्ष
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मे 2023 मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांना एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये त्यांना शून्य प्रदूषण वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने विद्यापीठांमध्ये रूफ टॉप सोलर (Rऊए) बसविण्याचे निर्देश दिले. व्हीटीयूने सौर पॅनेल बसविण्यात स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडूनही प्रोत्साहन मिळणार आहे.
बेंगळूर विद्यापीठात यापूर्वीच लागू
बेंगळूर विद्यापीठाच्या ज्ञानभारती कॅम्पसमध्ये यापूर्वीच सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. सुरुवातीला एव्हीला 2 लाख बचत होते. डॉ. के. आर. वेणुगोपाल यांनी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच सोलर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला होता. विद्यापीठाच्या वीजबिलात चार महिन्यांत 7.51 लाख रुपये बचत झाली आहे. सोलर पॅनेल बसविण्यापूर्वी बेंगळूर विद्यापीठाला महिन्याला 20 ते 22 लाख रुपये वीजबिल येत होते. सोलर पॅनेल बसविल्यानंतर वीजबिल 17 लाख रुपये येत आहे. एका कंपनीने विद्यापीठात सोलर पॅनेल मोफत बसविले आहेत आणि 25 वर्षे मोफत देखभालही करणार आहे.
विजेचा खर्च कमी करणार
विजेचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही सोलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अंमलबजावणीसाठी लागणारा खर्च, त्यातून होणारी बचत, याचा विचार करत असून त्यानंतरच अंमलबजावणी होईल.
-एस.विद्याशंकर, कुलपती, व्हीटीयू









