आंबोलीतील पावसाळी पर्यटन एक महिना उशिराने : हुल्लडबाज-मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची कारवाई 
वार्ताहर /आंबोली
आंबोलीत वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला. यावेळी घाटात 55 पोलीस कर्मचारी, पाच पोलीस अधिकारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले होते. हा सर्व बंदोबस्त सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार दत्तात्रय देसाई पोलीस व्हॅनने पेट्रोलिंग करत होते. पोलिसांनी आंबोली चेकपोस्टवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल केला. रस्त्यावरून जाताना आरडाओरड करणाऱ्या मद्यपी पर्यटकांवरही कारवाई करण्यात आली. पर्यटकांची गर्दी पाहून फॉरेस्ट नाका येथून वाहने मुख्य धबधब्यापर्यंत सोडण्यात येत होती. काही पर्यटक धबधब्यापर्यंत पायी जात होते. रविवारी सर्वच पॉईंटवर पर्यटकांची तुफान गर्दी दिसून आली. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने आंबोलीतील पावसाळी पर्यटन एक महिना उशिरा सुरू झाले. येथील सर्वच व्यावसायिकांना या पावसाची आतुरतेने वाट पाहावी लागली. कारण पाऊस नसल्याने धबधबे प्रवाहित झाले नव्हते. धबधबे प्रवाहित नसतील तर पर्यटकही येत नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चिंता होती. पाऊस सुरू झाल्याने धबधबे प्रवाहित झाले. पहिल्याच रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. शनिवारच्या तुलनेत रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. प्रत्येक पॉईंट पर्यटक तसेच वाहनांनी फुलून गेला होता. घाटातील मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट आणि हिरण्यकेशी या ठिकाणी गर्दी झाली होती.
मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची नजर
वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. वाहतूक नियम मोडणाऱ्या तसेच हुल्लडबाजी करून आरडाओरड करणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे काही मद्यपी, हुल्लडबाजी करणारे पर्यटक पोलीस चेकपोस्टच्या आधीपासूनच माघारी फिरले. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता कोठेही हुल्लडबाजी झाली नाही.
28 हजार 500 ऊपये दंड वसूल
आंबोलीत रविवारी वाहतूक पोलिसांनी मोटार व्हेईकल केस 45, लायसन्स सोबत नसणे 17, हेल्मेट न वापरणे 7, फॅन्सी नंबरप्लेट 6, ट्रिपल सीट 5, सीटबेल्ट न वापरणे 4, आरसे नसणे 3, काळ्या काचा 3 असे मिळून एकूण 28 हजार 500 ऊपयांचा दंड वसूल केला. वाहतूक हवालदार राजा राणे, हवालदार सुनील नाईक, पोलीस नाईक राजेश नाईक यांनी ही कारवाई केली.









