रविवारी मुसळधार : बळीराजा सुखावला : खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणारा पाऊस
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हुलकावणी दिलेल्या पावसाचा जोर रविवारी वाढला आहे. हा पाऊस सर्रास भागात झाला असल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. सध्याचा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. जून महिना व मृग नक्षत्र कोरडा गेला. यामुळे पाऊस कधी येणार याची चिंता बळीराजासह साऱ्यांनाच लागून राहिली होती. तालुक्याच्या काही भागात शनिवारी पावसाची रिमझिम झाली. तर रविवारी बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उशिरा का होईना मान्सूनला रविवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. जुलै महिन्याला सुरुवात झाली. मात्र यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरड्या अवस्थेत आहेत. तसेच पावसाळ्याअभावी खरीप हंगामातील कामे खोळंबली होती. यामुळे साऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. अखेर रविवारपासून प. भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खरीप हंगामातील कामांना जोर येणार आहे. सध्या काही शेतकरी रताळी वेल लागवड करू लागले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन पेरणीसाठी शिवारे तयार करून ठेवली आहेत. येत्या दोन दिवसात भुईमूग, सोयाबीन व बटाटा लागवड या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. मान्सून लांबणीवर पडला असल्यामुळे तालुक्यात अजूनही 80 टक्के भातपेरणी शिल्लक आहे. रविवारी मुसळधार पाऊस झाला असल्याने आता भातपेरणीच्या कामांना जोर येणार आहे. रविवारी सकाळपासूनच मुसळधार सरी बरसू लागल्या. दिवसभर हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी आले होते. दि. 8 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. हे मृग नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडेच गेले. दि. 23 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला तालुक्याच्या काही भागात पावसाची रिमझिम झाली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
तर दोन-तीन दिवसात नद्या प्रवाहीत
यंदा वळीव पावसाने हुलकावणी दिली होती. तसेच मानसूनही उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे सध्यातरी नदी-नाले कोरडेच आहेत. रविवारी ज्या पद्धतीने पाऊस झाला. असा पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात झाल्यास तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.









